संपादकीय

नवाब मलिकांमुळेच आर्यन, शाहरुख आणि अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !

 

मंत्री नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असताना आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ” नवाब मलिक इतके बेफाम झाले आहेत की त्यांनी मानसिक स्वास्थ जपण्याची गरज आहे. खरंतर मलिक यांच्यामुळेच आर्यन खान, शाहरुख खान आणि मंत्री अस्लम शेख अडचणीत आले आहेत”, असं आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिकांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यासाठी शेलार यांनीही पत्रकार परिषद घेतली.

नवाब मलिक अल्पसंख्याक लोकांना वेचून वेचून त्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत का? राज्याचा अल्पसंख्याक मंत्रीच अल्पसंख्याक समाजाला नेस्तनाभूत करण्याचं काम करतोय का? याचं आत्मपरिक्षण त्यांनी करायला हवं, असं आशिष शेलार म्हणाले. जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछुट आरोप करत सुटलेत. यात आर्यन खान आणि आता शाहरुख खानला देखील तेच अडचणीत आणत आहेत असं आशिष शेलार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. यात अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या रियाझ भाटीसोबतचे फडणवीसांचे फोटो नवाब मलिकांनी दाखवले. त्यावर आशिष शेलारांनी पत्रकार परिषदेत रियाझ भाटी याचे मंत्री आदित्य ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो दाखवून मलिकांच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिले होते.

“मलिक हास्यास्पद आरोप आणि फोटोबाजी करत असून असे एक ना हजार फोटो आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे मूळ मुद्द्यापासून मलिकांनी पळ काढू नये. मुंबई बॉम्बस्फोटात ज्याचा हात होता आणि सध्या तो तुरुंगात आहे. अशा शाहवली खान याच्यासोबत २००५ साली मलिकांनी व्यवहार कसा काय केला? हाच मुख्य प्रश्न आहे. त्याचं मलिकांनी उत्तर द्यावं. विषयाला भरकटवण्याचं काम करु नये. जनता सुज्ञ आहे असं आशिष शेलार म्हणाले.

 

Back to top button