ED ने नोंदवला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांचा जबाब !

मुंबई | ईडीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंगप्रकरणी तपासात सहकार्य करण्यासाठी कुंटे आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते.
अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना पोलिस खात्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टींगचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. लाखो रुपये घेऊन बदल्या आणि पोस्टींग दिल्याचा आरोप आहे. याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टींग प्रकरणावर कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात येत असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध पीएमएलएच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. देशमुख यांनी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते आणि मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून ही रक्कम वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे.