बीड
शेतकऱ्यांनी एआय चा उपयोग उत्पादन वाढीसाठी करावा: आमदार प्रकाश सोळंके

शेतकऱ्यांनी एआय चा उपयोग उत्पादन वाढीसाठी करावा: आमदार प्रकाश सोळंके
माजलगावात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मेळाव्याने दिली शेतकऱ्यांना नवी दिशा
माजलगाव (प्रतिनिधी):-शेतकऱ्यांनी एआय चा उपयोग उत्पादन वाढीसाठी करावा असे मत माजलगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी केले ते लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर आणि माजलगाव मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की, या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे दरवाजे उघडण्याची संधी निर्माण झाली आहे. विशेषतः ऊसपिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख करून देऊन शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल जागवण्याचा उद्देश यशस्वी झाला आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट ऊस उत्पादन वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम व योग्य वापर करणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे असे होते. एआय शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, व्हीएसआय पुणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शेतीमधील अनुप्रयोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊसपिकावरील रोगराईचे निदान लवकर करता येते, योग्य खतांचे नियोजन करता येते आणि सिंचनाचे वेळापत्रक ठरवता येते. आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे याचे व्यावहारिक मार्गदर्शन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी त्यांचे व्याख्यान मोठ्या लक्षपूर्वक ऐकले आणि अनेक प्रश्न विचारले.डॉ. विवेक भोईटे, एआय शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी शेतकऱ्यांना मोबाइल अनुप्रयोग आणि संवेदक यंत्रणांच्या वापराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पाण्याच्या कार्यक्षम वापराची पद्धत शिकवली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांची काळजी कशी घ्यावी याची व्यावहारिक माहिती दिली. उपकृषी अधिकारी आणि पोखरा तज्ञ आतिष चाटे, केसापूरी यांनी पोखरा योजनेचे फायदे सांगून शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी पावसाचे पाणी साठवून ठेवल्यास वर्षभर सिंचनाची समस्या कशी सोडवता येते आणि भूजलाची पातळी कशी वाढविता येते याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. या सर्व तज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
चेअरमन श्री. वीरेंद्र सोळंके आणि व्हाईस चेअरमन श्री. जयसिंह सोळंके यांनी शेतकरी बांधवांना आवाहन करताना म्हटले की, आजच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून आपले उत्पादन वाढवावे आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवावा. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला नवीन दिशा द्यावी असे आवाहन केले. तर अध्यक्षीय समारोप मध्ये मोहनराव सोळंके यांनी या मेळाव्यातील मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल असं मत व्यक्त केलं. मेळाव्याच्या शेवटी शेतकऱ्यांनी या नवीन माहितीचे स्वागत केले आणि आपापल्या शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी शेतकरी आणि तज्ञांनी आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंदफणा पब्लिक स्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सखाराम जोशी यांनी तर आभार माजी जिल्हापरिषद बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवानराव शेजुळ यांनी अथक परिश्रम घेतले.



