बीड
भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक; महाड-माणगाव MIDC मधील परप्रांतीय कामगारांची मांडणार कुंडली

भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक; महाड-माणगाव MIDC मधील परप्रांतीय कामगारांची मांडणार कुंडली
जिल्हाध्यक्षपद स्वीकारताच राज पारटे यांची पहिली मोठी धडक कारवाई; स्थानिक तरुणांच्या नोकरीसाठी लढ्याची घोषणा
रायगड/माणगांव (संदेश घोलप)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज गणपत पार्टे यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला आहे. महाड आणि माणगाव MIDC परिसरात कार्यरत असलेल्या परप्रांतीय व स्थलांतरित कामगारांची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी माणगाव पोलीस प्रशासनाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतरचे हे त्यांचे पहिले अधिकृत पाऊल मानले जात असून, स्थानिक युवकांना औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी मनसेकडून मोठा संघर्ष उभारला जाणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
राज पार्टे यांनी दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या Inter-State Migrant Workmen Act 1979 या कायद्याचा संदर्भ देत, कंपन्या व कंत्राटदारांकडे कार्यरत असलेल्या स्थलांतरित कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित करावी, अशी मागणी केली आहे.
मनसेच्या मते, महाड आणि माणगाव औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे रायगडमधील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरे ओसाड पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना राज पार्टे म्हणाले की,
“महाड आणि माणगाव MIDC ही आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभी राहिलेली औद्योगिक क्षेत्रे आहेत. मात्र स्थानिक युवक बेरोजगार असून बाहेरील कामगार मोठ्या प्रमाणात येथे कार्यरत आहेत. स्थानिकांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे. गावातील ओसाड पडलेली घरे पुन्हा भरलेली दिसावीत, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
निवेदनामध्ये कंपन्या व कंत्राटदारांकडून अत्यावशक माहिती गोळा करण्याची मागणी करण्यात आली आहे
मनसेने स्पष्ट केले आहे की, या माहितीनंतर महाड आणि माणगाव MIDC मधील बाहेरील कामगारांची वस्तुस्थिती समोर आणली जाईल आणि स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
राज पार्टे यांच्या या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये आशा निर्माण झाली असून, औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटदार आणि कंपन्यांमध्येही हालचाली वाढल्या आहेत.
आता पोलीस प्रशासन या निवेदनावर काय कारवाई करते आणि मनसेचा हा रोजगार लढा पुढे कोणते वळण घेतो, याकडे संपूर्ण दक्षिण रायगडचे लक्ष लागले आहे.



