बीड

बीडमधील संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांचे आजोबांचे समाधी स्थळ  अतिक्रमणाच्या विळख्यात

बीडमधील संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांचे आजोबांचे समाधी स्थळ  अतिक्रमणाच्या विळख्यात
*गोविंदपंतांच्या समाधी परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढा नसता गंभीर परिणाम होतील :- जिल्हाप्रमुख सचिन मुळूक*
 *जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक,  न.प. मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*
बीड (प्रतिनिधी)  शहरातील जैन भवन परिसरातील बिंदुसरा नदीकाठी असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत मुक्ताई यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधी परिसरावर अतिक्रमणाचा विळखा बसला असून, त्यामुळे वारकरी आणि हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी तात्काळ कारवाई करुन अितक्रमण हटवावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
बीड शहरातील गोविंदपंतांची समाधी हे वारकरी संप्रदायाचे अतिशय पवित्र स्थळ आहे. संत मुक्ताईंच्या जीवनाशी या स्थळाचा थेट भावनिक संबंध आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात संत मुक्ताईंची पालखी बीडमध्ये येते आणि या ठिकाणी आजोबा-नातीच्या भेटीचा पारंपरिक सोहळा पार पडतो. मुक्ताईंची पालखी गोविंदपंतांच्या समाधीस्थळी काही काळ विसावते, त्यामुळे हे स्थळ धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.
मात्र, अलीकडच्या काळात गोविंदपंतांच्या समाधी परिसरातील सुमारे 1200 चौ.मी. क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही जणांनी या ठिकाणी बांधकामे करून परिसराची पवित्रता भंग केली असून, वारकरी व भक्त वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदरील ठिकाण संत परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. येथे झालेल्या अतिक्रमणामुळे संत परंपरेचा अपमान झाला आहे. जिल्हा प्रशासनाने अितक्रमणधारकांवर ठोस कारवाई करून समाधी परिसर मूळ स्वरूपात आणावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे.
Back to top button