बीड
बदामराव पंडित, बाळराजे पवार यांची एक तास बैठक ; निवडणुकीचे ठरले !

बदामराव पंडित, बाळराजे पवार यांची
एक तास बैठक ; निवडणुकीचे ठरले !
गेवराई ( प्रतिनिधी ) माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच युवा नेते बाळराजे पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही भाजप नेत्यांमध्ये तब्बल एक तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरल्याचे समजते.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याचे मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच गेवराईत भाजपा युवा नेते बाळराजे पवार यांनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह विविध विषयावर सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली. पुढील रणनीती कशी असावी हेही ठरल्याचे समजते. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि न प निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित व्यापक बैठक घेण्याचेही यावेळी ठरले आहे.
या बैठकीनंतर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी युवानेते बाळराजे पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, युवानेते यशराज पंडित, शिवाजीराव मोटे, माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, सरपंच कैलास माने, सरपंच मुकुंद बाबर, बबलू खराडे, भाऊसाहेब माखले, प्रकाश तळेकर, गणेश लाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.



