बीड

पारदर्शक आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले – आ. सुरेश धस

पारदर्शक आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले – आ. सुरेश धस

आष्टी ( प्रतिनिधी )
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या घटनेवर आमदार सुरेश धस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात आ. धस म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्याने मन हेलावून गेले आहे. शोक व्यक्त करताना शब्द अपुरे पडत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने आजची सकाळ अत्यंत दुर्दैवी ठरली आहे.”
ते पुढे म्हणाले, “स्वभावाने अजितदादा जरी थोडे फटकळ वाटत असले, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ, पारदर्शक आणि प्रामाणिक होते. त्यांच्या बोलण्यात कधी कधी कठोरपणा जाणवत असे, मात्र ज्या व्यक्तीशी ते फटकळपणे बोलत, त्याच व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याचे काम करून देणे, हा त्यांचा खरा स्वभाव होता.”
आपला व्यक्तिगत संबंध अधोरेखित करताना आ. धस म्हणाले, “मी दादांच्या अत्यंत जवळ होतो. त्यांना अतिशय जवळून पाहिले आणि समजून घेतले. त्यामुळेच त्यांचा हा अचानक आणि दुर्दैवी अपघात स्वप्नातही न पाहिलेला, मोठा धक्का देणारा आहे.”
काम, नेतृत्व आणि माणुसकीच्या प्रत्येक क्षेत्रात ‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा नेता आज अचानक आपल्यातून निघून गेला, ही बाब अत्यंत वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शेवटी आ. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांच्या आठवणी आणि त्यांनी जपलेली मूल्ये सदैव प्रेरणा देत राहतील,” असे नमूद केले.

Back to top button