आजच्या काळात माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाही – कवी प्रा. विजय पोहनेरकर

आजच्या काळात माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाही – कवी प्रा. विजय पोहनेरकर
सौ. के.एस.के. महाविद्यालयात विविध भाषा वाङमय व सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन संपन्न
बीड (प्रतिनिधी) :”आजच्या काळात माणूस माणसाशी माणसासारखा वागत नसून त्याने परस्परांशी संवाद सोडला आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी केले. बीड येथील सौ. के.एस.के. महाविद्यालयात आयोजित विविध भाषा वाङ्मय मंडळ व सामाजिकशास्त्र मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपा क्षीरसागर उपस्थित होत्या, तर नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान कवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी आपल्या खास शैलीत समाजप्रबोधनपर व विनोदी कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यांनी ‘माकड म्हणतो जीवनाचा कंटाळा आला, माणसाला शेपूट येईल का?’, ‘मॅरेज जुळवणी प्लांट’, ‘वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो’ आणि अत्यंत भावनिक अशी ‘बाप नावाचा पांडुरंग’ या कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दीपा क्षीरसागर यांनी तरुणांना मोलाचा संदेश दिला. माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे सांगत त्यांनी “बीड जिल्हा ही गुणवंतांची खान असून विविध क्षेत्रात येथील लोकांनी भरीव कामगिरी केली आहे,” असे गौरवोद्गार काढले. तरुणांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन व्यसनांपासून दूर राहावे आणि महापुरुषांचे चरित्र आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या काळात मानवी संवेदनशीलता हरवत चालली असून, ती टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ‘आईचं पत्र’ आणि ‘या मुलींना सारं कळतं’ या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे व ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. महाविद्यालयाच्या ‘दुर्वांकुर’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांच्या बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘साऊंड’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. नाट्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दुष्यंता रामटेके यांच्या ‘दिग्दर्शन, संकल्पना व स्वरूप’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. शीतल इगडे यांच्या हिंदी बालसाहित्य वरील ‘बाल मन से विमर्श तक’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. तसेच मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विभागांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखीत भित्तीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याला उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. शंकर राऊत, पर्यवेक्षक प्रा. आसाराम खुटाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आबासाहेब राठोड यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. लालासाहेब घुमरे यांनी पार पाडले, तर आभार प्रा. डॉ. ए. एस. खान यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षककेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



