बीड
माय आणि मातीशी आमचं घट्ट नातं ; पशुसंवर्धनातून मोठी रोजगार निर्मिती करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माय आणि मातीशी आमचं घट्ट नातं ; पशुसंवर्धनातून मोठी रोजगार निर्मिती करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*महा पशुधन एक्सोचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक*
*_पशुसंवर्धन विभागाच्या सर्व प्रस्तावित योजनांना भरघोस निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही_*
*मुख्यमंत्री पशुधन उद्योग योजना प्रभावीपणे राबवणार – ना पंकजाताई मुंडे*
परळी वैजनाथ दि. १४….
माय आणि मातीशी आमचं घट्ट नातं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे काही चक्र आहे ते सर्व पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक साखळीला अनुसरूनच आहे. पशुसंवर्धना च्या माध्यमातून येणाऱ्या काळात मराठवाडा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात नवनवीन प्रयोग, अनुसंधान साधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रभावीपणे काम सुरू केले असून पशुसंवर्धनातून रोजगार निर्मितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या सर्व प्रस्तावित नवनवीन योजनांना भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी वैजनाथ येथील महा पशुधन एक्सपो च्या समारंभात दिली. तर भारतात पशुपालनाला कृषीचा दर्जा देणारे, अतिशय जबाबदार मुख्यमंत्री आपल्याला लाभले असून येणाऱ्या काळात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नवउद्योजक तयार करण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन उद्योग योजना प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
पशूसंवर्धन विभागाच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून ना. पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून कालपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील महा पशुधन एक्सपोचा मुख्य समारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एक्सपो मधील विविध स्टाॅल्सना भेट देत मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. व्यासपीठावर ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आमदार बदामराव पंडित,माजी आमदार गोविंद केंद्रे, संजय दौंड, परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी , गेवराईच्या नगराध्यक्षा गीता भाभी पवार , गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,अक्षय मुंदडा पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, प्रवीण कुमार देवरे डॉ. मुकणे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आदींसह नेतेगण, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*मुख्यमंत्र्यांनी केले पंकजाताईंचे भरभरून कौतुक*
————-
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांनी चांगले व प्रभावी काम सुरू केले आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी राज्य सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आपलं नातं हे माय आणि मातीशी घट्ट असून त्या दृष्टीने काम करण्याचा आपल्या सरकारचा संकल्प आहे. आपल्या संस्कृतीनेच आपल्याला निसर्ग, माती, पशु, वनस्पती यांच्याशी जोडलेले आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक देवते सोबत पशु आणि वनस्पती यांचे अवतार आपल्याला बघायला मिळतात. आजच्या आधुनिक काळामध्ये माय आणि माती यांच्याशी तुटत चाललेली नाळ सांगड घालून पुन्हा जोडण्याच्या दृष्टिकोनातून पशु संवर्धनाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या माध्यमातून शेतकरी समृद्ध, संपन्न होणार आहे. मराठवाडा ,विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व योजनांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भरघोस निधीची तरतूद आपले सरकार निश्चित करणार आहे. नैसर्गिक शेती, पशुसंवर्धन त्यातून रोजगार निर्मिती नवनवीन संशोधन, वेगवेगळ्या दुग्ध वाढीच्या उपक्रम सरकार प्रभावीपणे राबवणार आहे. येणाऱ्या काळात वैरण विकास हा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे. यासाठी पंकजाताई मुंडे प्रभावीपणे निश्चित काम करतील अशी आपल्याला खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंकजाताई मुंडे यांनी महा पशुधन एक्सपो अतिशय सुरेख व सुंदर आयोजित केला. या महा एक्स्पोच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग, पशुपालन विषयक नवीन माहिती विविध जातीवंत पशुपालनाच्या संकल्पना या प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत. यातूनच खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
_*पशुसंवर्धनातून ग्रामीण अर्थकारणाला गती – ना.पंकजाताई मुंडे*
–—————
यावेळी बोलताना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो किंवा जलस्वराज्य योजना असो या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव ग्रामीण महाराष्ट्रात कोरले गेले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही आपल्याला प्रभावीपणे काम करून दाखवायचे आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शेतकरी व पशुपालकांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे ध्येय घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रभावीपणे काम करण्यासाठी मुख्यमंत्री खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत. देशात पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धना च्या माध्यमातून महाराष्ट्राचा आर्थिक विकास करण्याची आपली संकल्पना आहे. पशुपालनातून तरुणांना रोजगारक्षम आणि उद्योगी बनविण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन उद्योग योजना प्रस्तावित केली आहे या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना प्रभावीपणे राबवून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याच्या जीडीपी मध्ये वाढ करण्यासाठी यातून पशुसंवर्धन विभाग निश्चितपणाने योगदान देणार आहे. ग्रामीण भागातील 24 लक्ष तरुणांना उद्योजक बनविण्याची ही योजना आमच्याकडे आहे. दूध उत्पादनामध्ये देशात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र ही या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या मनामनात कोरले जाईल असे काम प्रामाणिकपणे आपण करणार असल्याचे यावेळी पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पारितोषिके, अनुदान वितरित*
———————-
महा पशुधन एक्स्पो 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रतिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण केले. ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत ‘उमेद सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनीला अनुदानाच्या बारा लाख 27 हजार 500 या पहिल्या हप्त्याचे वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या दहाव्या अंकाचे तसेच विभागाच्या दिनदर्शिका 2026 चे अनावरण करण्यात आले.परळी वैजनाथ येथील डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. त्याचबरोबर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे च्या फिरत्या प्रयोगशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. पशुप्रदर्शनातील विविध स्पर्धांमधील पशुपालकांना बक्षिसांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
••••



