एनएससी म्युझिक अकॅडमीची ‘परंपरा’ संगीत सभा ठरली बीडच्या सांगीतिक विश्वातील प्रेरणादायी पर्व

बीड (प्रतिनिधी): एनएससी म्युझिक अकॅडमी, बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘परंपरा’ संगीत सभा अत्यंत उत्साहपूर्ण, दर्जेदार आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाली. भारतीय संगीत परंपरेचा वारसा जपत नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बीड शहरात अनेक नामवंत कलाकारांचे कार्यक्रम होत असतात. मात्र स्थानिक नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने करणारे एनएससी म्युझिक अकॅडमी हे एक आगळेवेगळे संगीत विद्यालय ठरत आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून या संगीत सभेला ‘परंपरा’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बाहेरगावच्या कलाकाराऐवजी एनएससी म्युझिक अकॅडमीचा विद्यार्थी चि. साहस सुमित जाजू याला प्रमुख कलाकार म्हणून सादरीकरणाची संधी देण्यात आली. त्याने सादर केलेल्या दमदार, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी तबलावादनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भक्तिगीत, नाट्यगीत आणि भावगीतांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. या गायनाला अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी तबला व पखवाजाची सुरेख साथ देऊन कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली.
या कार्यक्रमात कु. दुर्गा लोळगे, सौ. ज्योती गोविंदराव लोळगे, सुशीलाताई काळे, सौ. छायाताई बडे, चि. स्वराज सिद्धांत चव्हाण, सौ. सुवर्णा कुलकर्णी, सौ. प्रिया जाजू, श्री डमरे सर, चि. वेदांत काजळे तसेच ऋषिकेश शिंदे, ऋषिकेश थोरबोले, अभिषेक थापडे, अर्णव साळुंके, सुमित कुलकर्णी, नेहा सोनावणे, पृथ्वीराज येडे, शिवराज काळे, अमर शिंदे, अजय सहजराव, गोविंद काळे, श्रीयश कंटक, सार्थक कुलकर्णी, श्री अशोकराव चव्हाण, तेजस काळे, हरी चव्हाण, स्वराज बडे, कैवल्य मोरे आणि चैतन्य लोळगे यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी श्री सतीशजी सुलाखे सर, श्री वसुदेवजी काजळे सर, श्री केदारनाथजी चव्हाण, सुनील महाराज घोडके आणि श्री गोविंद लोळगे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. एनएससी म्युझिक अकॅडमी, बीड ही केवळ संगीत शिकवणारी संस्था नसून नवोदित कलाकार घडविणारी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी आणि त्यांना प्रत्यक्ष सादरीकरणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी एक सांगीतिक चळवळ बनत आहे. सातत्यपूर्ण उपक्रम, दर्जेदार प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे कार्य यामुळे आज या अकॅडमीची ओळख महाराष्ट्रभर निर्माण होत आहे. संगीत क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावावे, येथील कलाकारांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करावी, या उदात्त ध्येयाने एनएससी म्युझिक अकॅडमी सातत्याने कार्यरत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अकॅडमीचे संचालक नरहरी दळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार, पालक, विद्यार्थी आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. ‘परंपरा’ ही केवळ संगीत सभा नसून भारतीय संगीत संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा, नवोदित कलाकारांना आत्मविश्वास देणारा आणि बीडच्या सांगीतिक परंपरेला नवी दिशा देणारा उपक्रम आहे. अशा स्वरूपाचे कार्यक्रम विरळाच पाहायला मिळतात. त्यामुळे आजची ‘परंपरा’ संगीत सभा हा बीडच्या सांगीतिक इतिहासातील एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सोहळा ठरला.



