बीड

अखेर १९ दिवसांच्या ऐतिहासिक शिक्षक लढ्याला यश!

अखेर १९ दिवसांच्या ऐतिहासिक शिक्षक लढ्याला यश!
३१ मार्च २०२७ पासून वाढीव टप्पा अनुदान; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आझाद मैदानावरील संघर्षाला मिळाले यश;
आ. रोहित पवार यांच्यामुळे टप्पा वाढीचा प्रश्न शासनासमोर अधिक ठळक, निर्णय प्रक्रियेला मिळाली गती
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) :
सलग १९ दिवस मुसळधार पाऊस, गैरसोयी आणि प्रचंड संघर्ष सहन करत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या ऐतिहासिक आंदोलनाला अखेर यश मिळाले. राज्य सरकारने पात्र अंशतः अनुदानित शाळांना ३१ मार्च २०२७ पासून वाढीव टप्पा अनुदान लागू करण्यात येईल अशी  घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या शिक्षकांसमोर करताच संपूर्ण मैदानात जल्लोष उसळला. आंदोलन कर् शिक्षकांनी एकमेकांचे अभिनंदन करत आपल्या संघर्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आ. मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शासनाचा निर्णय जाहीर केला. यावेळी वाढीव टप्प्याची अनुदानाची रक्कम पात्र शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी २२ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षक  सहभागी झाले होते. प्रतिकूल हवामान, राहण्याच्या अडचणी आणि अनेक गैरसोयी असूनही शिक्षकांनी शिस्तबद्ध, संयमी आणि निर्धार पूर्ण पद्धतीने सलग १९ दिवस आंदोलन सुरू ठेवले. शासनाकडून सकारात्मक घोषणा होताच आझाद मैदानावर विजयाचा उत्साह संचारला. या आंदोलनादरम्यान विविध पक्षांतील अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांना पाठिंबा दिला. त्यामध्ये आ. रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. शिक्षकांच्या न्याय्य मागणीसाठी ते आझाद मैदानावर रात्री उशिरापर्यंत ठामपणे उभे राहिले. शिक्षका सोबत रात्रभर आंदोलनस्थळी थांबण्याची तयारीही त्यांनी दर्शविली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने लागू असलेल्या नियमांची माहिती दिल्यानंतर आंदोलनात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या भूमिकेतून त्यांनी आंदोलनस्थळ सोडले. दरम्यान
आ. रोहित पवार यांनी घेतलेल्या आक्रमक आणि ठाम भूमिकेमुळे वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न शासनासमोर अधिक ठळकपणे मांडला गेला आणि निर्णय प्रक्रियेला गती मिळाली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी शिक्षक आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात चर्चांना वेग आला आणि अखेर शासनाने शिक्षकांच्या प्रमुख मागणीवर सकारात्मक निर्णय जाहीर केला.
वाढीव टप्पा अनुदानाची घोषणा होताच आझाद मैदानावर उपस्थित हजारो शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून वाढीव टप्पा अनुदानाची रक्कम वेळेत पात्र शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा आंदोलनात सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली.
Back to top button