आनंदवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

आनंदवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी राजेंद्र रामभाऊ वनवे यांच्या शेतामध्ये अचानक लागलेल्या आगीने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या जोरामुळे वीजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून आग भडकली. ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच शेतामधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
शेतकरी वनवे यांच्या शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे सुमारे ७० ते ८० पाईप, गोटा, आणि शेतीशी संबंधित इतर साहित्य पूर्णपणे जळून गेले. याशिवाय जनावरांसाठी साठवून ठेवलेला कोरडा व हिरवा चारा देखील आगीत भस्मसात झाला. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, वनवे कुटुंब संकटात सापडले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत खूप नुकसान झाले होते. शासकीय यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा व राजेंद्र वनवे यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



