रायगड

खोपोलीतून नक्षलवादी ‘लॅपटॉप’ अटकेत

खोपोलीतून नक्षलवादी ‘लॅपटॉप’ अटकेत

कर्जत (जयेश जाधव)
नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ डोणवत गावात ‘सुनील जगताप’ या बनावट नावाने राहात होता. आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचे ढोंग करत आपली खरी ओळख लपवत होता. मात्र, पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन 4 मे रोजी अधिकृतपणे अटक केली आहे. देवमाणसाच्या रूपात खालापुरात वावणारा शिक्षक नक्षलवादी असल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात 2011 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्याला न्यायालयाने फरार घोषित करत निरंतर अटक वॉरंट व जाहीरनामा जारी केला होता. आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप गेल्या 6 ते 7 वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत तीन वर्षे राहिल्यानंतर जि.प. शाळेसमोरील इमारतीत राहात होता. कुटुंबांसोबत राहात नसल्यामुळे तिन्हीवेळचे जेवण हॉटेल, चायनीजच्या गाडीवर करीत होता. त्याच्याकडे एक स्कुटी होती, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. परंतु, शिक्षकाच्या वेशात आदिवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी जात असल्याने ग्रामस्थांच्या समोर देवमाणूस होता.आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप यांच्याबद्दल पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि 4 मे रोजी अधिकृतपणे अटक केली. सोमवारी (दि.5) त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहे. या अटकेमुळे नक्षलवादी हालचालींना मोठा झटका बसला असून, आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे.

डोणवत गावात गेली 6 ते 7 वर्षापासून देवमाणसाच्या रूपावत वास्तव्यास असणारा आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे बनावट नाव सुनील जगताप नक्षलवादी निघाल्याने खालापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, या कालावधीत कोणकोणते प्लॅन केलेत का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Back to top button