📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पेट्रोल-डिझेल टंचाई, महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ. गणेश ढवळे

पेट्रोल-डिझेल टंचाई, महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन :-
डॉ. गणेश ढवळे

बीड (दि.१) : राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी वाहनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात “राम नाम सत्य है, पेट्रोल बडा महेंगा हैं” जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुबीन ,सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, रामनाथ खोड, माजी सैनिक अशोक येडे,  किष्किंधा पांचाळ, सिता दहे ,रामधन जमाले, भिमराव कुटे,बाजीराव ढाकणे, डॉ.सुदाम तांदळे, प्रदीप औसरमल, दत्ता प्रभाळे,मायकल वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका वाहनधारकांसह शेती क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे.

ऐन लग्नसराईचा हंगाम व उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात अनेक पेट्रोलपंपांवर “नो स्टॉक”चे फलक झळकू लागल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी विशेषतः अडचणीत सापडले असून पेट्रोलपंप चालकांकडून कॅन, डबे किंवा भांड्यात डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि अन्य कृषी यंत्रणा ठप्प पडत आहेत.

परिणामी नांगरणी, पेरणीपूर्व मशागत तसेच पिकांना पाणी देण्याची कामे खोळंबली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे इंधन टंचाई तातडीने दूर करून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

Back to top button