बीड

मौजे कुर्ला येथील रस्ता व अल्पसंख्यांक समाज विकासाचे मुद्दे नानाभाऊ पटोले यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले

मौजे कुर्ला येथील रस्ता व अल्पसंख्यांक समाज विकासाचे मुद्दे नानाभाऊ पटोले यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले

डॉ. शेरखान यांनी राधाताई मखमाले, नानाभाऊ पटोले यांचे मानले आभार
बीड (प्रतिनिधी) – तालुक्यातील मौजे कुर्ला येथील पठाण वस्ती ते लोळदगाव ते कुर्ला शिव पर्यंत च्या रस्त्यांचा प्रश्न आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाबाबत जिल्हास्तरावर असलेल्या उदासीन कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश जनरल सेक्रेटरी डॉ. शेरखान यांनी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राधिकाताई मखमाले यांच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडले होते. हे दोन्ही मुद्दे पटोलेंनी हिवाळी अधिवेशनात उचलल्याने डॉ. शेरखान यांनी दोघांचेही आभार मानले.
मौजे कुर्ला ता. जि. बीड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पठाण वस्ती ते लोळदगाव ते कुर्ला शिव पर्यंत खडीकरण रस्त्याचे काम न करताच बोगस बिल उचलण्यात आले. यात रस्त्यासाठी मंजूर झालेल्या वीस लक्ष रकमेचा भ्रष्टाचार करण्यात आला असून हा निधी गुत्तेदाराने उचलून खाल्ला आहे. या रस्त्यावर मुरूम किंवा खडीकरण करण्यात आलेले नाही. याविषयी डॉ. शेरखान यांनी गट विकास अधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पालकमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देऊनही आतापर्यंत कसलीही चौकशी झालेली नाही. संबंधित गुत्तेदाराने या रस्त्यांसाठी आलेला वीस लक्ष रुपयांचा निधी गिळंकृत केला आहे. अशा भ्रष्टाचारी गुत्तदारांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होऊन सुद्धा नागरिकांचे जे हाल व्हायचे ते होतच आहेत. रस्त्याचे काम केल्याचे फक्त कागदोपत्री दाखविण्यात आल्याने हा मुद्दा डॉ. शेरखान यांनी पक्षाच्या नेत्या राधाताई मखमाले यांच्या माध्यमातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मांडला.
याशिवाय शासनाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी जिल्हा स्तरावर असलेल्या उदासीन कार्यपद्धतीवर सुद्धा डॉ. शेरखान यांनी लक्ष वेधले. अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राज्यस्तरावर विकासात्मक ध्येयधोरणे जाहीर करण्यात येतात मात्र या ध्येयधोरणाची अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनात मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. बीडमध्ये जिल्हा अल्पसंख्यांक विकास कार्यालय नाही. जिल्हा नियोजन अधिकारी कडे याचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. हे कार्यालय स्वतंत्रपणे सुरू होणे गरजेचे आहे. स्वतंत्र कार्यालय सुरू करून तिथे अधिकारी, एक-दोन लिपिक, एक शिपाई यांची नेमणूक होणे गरजेचे आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यायला हवी. समितीच्या तिमाही बैठका व्हायला हव्यात. अल्पसंख्यांक समाजाचा विकास व समस्यांची सोडवणूक झाली पाहिजे. अशा मागण्याही डॉ. शेरखान यांनी पक्षाच्या नेत्या राधाताई मखमाले यांच्या माध्यमातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडल्या होत्या. याची दखल घेऊन नानाभाऊ पटोले यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे उचलून धरत आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने मांडल्याने डॉ. शेरखान यांनी मांडलेले प्रश्न व मागण्या हिवाळी अधिवेशनात गाजल्या. याबद्दल डॉ. शेरखान यांनी नेत्या राधाताई मखमाले आणि नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त केले आहे.

Back to top button