बीड
श्रीवर्धनच्या वेळास आगर येथे ‘साखर चौथ’ गणपतीचे थाटात आगमन; ४ थ्या वर्षात उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू

श्रीवर्धनच्या वेळास आगर येथे ‘साखर चौथ’ गणपतीचे थाटात आगमन; ४ थ्या वर्षात उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू
मच्छीमारांच्या नव्या हंगामाची सुरुवात आणि आगरी-कोळी बांधवांमध्ये उत्साहाचे उधाण; वेळास आगरमध्ये रात्री रंगणार सुपरहिट ‘शक्ती-तुरा’
श्रीवर्धन (संदेश घोलप):
अनंत चतुर्दशीला मुख्य गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कोकण, रायगड, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागात बाप्पाचे पुन्हा एकदा जल्लोषात पुनरागमन झाले आहे. निमित्त आहे पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या ‘साखर चौथ’ उत्सवाचे. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यानंतर आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला या विशेष गणपतीची घरोघरी आणि मंडळांमध्ये अत्यंत भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
विशेषतः पेण, पनवेल, उरण, मुरुड, रोहा, पालघर आणि श्रीवर्धन परिसरातील आगरी-कोळी समाजामध्ये या सणाला दिवाळीसारखे महत्त्व असते. गणेश चतुर्थीच्या काळात ज्यांच्या घरात सुतक किंवा इतर काही कारणांमुळे बाप्पाची मूर्ती आणता आली नव्हती, त्या परिवारांनी या दिवशी गौरा गणपती म्हणजेच ‘साखर चौथ’ गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो
वेळास आगर येथे उत्सवाचे ४ थे वर्ष; भजनांचा गजर आणि बालगोपाळांचा उत्साह
श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारी वसलेल्या वेळास आगर या चिमुकल्या खेडेगावात श्री साखर चौथ गणपतीचे यंदा ४ थ्या वर्षात अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे. या दीड दिवसांच्या उत्सवासाठी वेळास आगरसह परिसरातील सर्व ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत.
सकाळी बाप्पाच्या मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा आणि आरती करून सोहळ्याची सुरुवात झाली. याप्रसंगी बालगोपाळांचे भजन तसेच स्थानिक भजनी मंडळाकडून सादर करण्यात आलेल्या गणपतीच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून रात्री श्रीवर्धनमधील सुपरहिट ‘शक्ती-तुरा’ या पारंपरिक लोककलेचा रंगतदार सामना आयोजित करण्यात आला आहे.
बाप्पाच्या चरणी गावाला सुखात ठेवण्याचे ‘गाऱ्हाणे’
वेळास आगर येथील दीड दिवसाच्या उत्सवादरम्यान सर्व गावकऱ्यांनी बाप्पाची पूजा करत भावपूर्ण गाऱ्हाणे घातले— “हे बाप्पा, आमच्या वेळास आगर गावाला सुखात-समृद्धीत ठेव, गावावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस आणि सर्व गावकऱ्यांना अशीच एकी व आनंद दे.”
या सोहळ्याला अध्यक्ष श्री रणजित मुरकर साहेब, मुकेश पाटील, नितेश तोंडलेकर, पुष्कर रिळकर, मृदास तोंडलेकर, विकेश लाड, राजू तोंडलेकर, सौरभ शिलकर, बंड्या निगडे, कल्पेश मुरकर, अमित तोंडलेकर यांच्यासह महिला मंडळात हेमलता तोंडलेकर, स्नेहा मुरकर, सेजल पेडणेकर, वृशाली मुरकर, ऋतुजा भाटकर, मंजिरी तोंडलेकर, शालीनी मुरकर, प्रविणा मुरकर आणि असंख्य महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरेच्या पुरणाचा महानैवेद्य अन् मच्छीमारांच्या नव्या हंगामाचा प्रारंभ
साखर चौथच्या दिवशी बाप्पाला साखरेच्या पुरणाचे मोदक आणि साखरेची आकर्षक कावड अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे.
सागरी किनारपट्टीवरील बांधवांसाठी हा उत्सव केवळ धार्मिक नसून त्यांच्या उपजीविकेशीही जोडलेला आहे. या दीड किंवा अडीच दिवसांच्या गौरा गणपतीच्या विसर्जन सोहळ्यानंतर मच्छीमार बांधव समुद्रात मासेमारीच्या नव्या हंगामाची अधिकृत सुरुवात करतात. त्यामुळे या गणपतीला व्यवसायात समृद्धी आणणारा देव मानले जाते. पुढील दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण कोकण आणि किनारपट्टी भागात जणू दुसऱ्या गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळत आहे.



