बीड

श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची संघटनात्मक धडाकेबाज सुरुवात; तोंडलेकरांचा सत्कार, श्याम भोकरे यांचा जाहीर प्रवेश

श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची संघटनात्मक धडाकेबाज सुरुवात; तोंडलेकरांचा सत्कार, श्याम भोकरे यांचा जाहीर प्रवेश

श्रीवर्धन (संदेश घोलप) : तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर यांच्या सत्कार सोहळ्यासह लोकनेते श्याम भोकरे यांच्या जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त आयोजित तालुका आढावा बैठकीत संघटन मजबुती व विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुकुमार तोंडलेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडले. आपल्या भाषणात प्रमोद घोसाळकर यांनी तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पंचायत समिती स्तरावर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याच वेळी लोकनेते श्याम भोकरे यांनी स्वगृही पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा भगवा ध्वज हाती घेत त्यांनी तालुक्यात शिवसेनेचे बळ वाढवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला. त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तालुका प्रमुख ओमकार शेलार, विरोधी पक्ष नेते पिंट्या वेश्वीकर, सलोनी मोईत, नगरसेवक देवेंद्र भुसाणे, अविनाश कोळंबेकर, अक्षता कोळंबेकर, विभाग प्रमुख प्रज्योत नांदविडकर,अभिजीत हेदुकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकदिलाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीदरम्यान गावनिहाय संघटन आढावा, प्रलंबित प्रश्न, शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच युवक व महिला आघाडीच्या बळकटीकरणावर चर्चा करण्यात आली. येत्या काळात जनसंपर्क मोहिमा आणि बूथस्तरावर संघटन उभारणी करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.

एकंदरीत, सत्कार समारंभ, पक्षप्रवेश आणि आढावा बैठक या तिन्ही कार्यक्रमांमुळे श्रीवर्धन तालुक्यात शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Back to top button