
आज नियतीच्या घड्याळाची वेळ चूकली….
….माननीय अजितदादांचा कार्यकाल मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे. आज मागे वळून पाहताना ते दिवस, त्या आठवणी आणि त्या काळात घडलेली राजकीय-सामाजिक स्थिती डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. त्या काळात मी पुण्यात एम.ए.चे शिक्षण घेत होतो. सदाशिव पेठेतील ‘ज्ञान प्रबोधिनी’ स्पर्धा परीक्षा केंद्रात रोज अभ्यासासाठी जात असे. अभ्यास, चर्चा, वर्तमानपत्र, राजकारण यांची सतत रेलचेल असलेला तो काळ होता. त्या अभ्यासकाळात मी लाहोटी चौकाजवळील लाहोटी बिल्डिंगमध्ये राहत होतो. माझ्यासोबत कराड, सातारा, बारामती आणि दोन गुवाहाटीचे असे एकूण सहा जण एकत्र राहत होतो. वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेली माणसं, वेगवेगळे विचार, पण एक समान ध्यास काहीतरी मोठं करण्याचा.
माझा एक मित्र बारामतीचा असल्यामुळे बारामतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक माहिती नकळत माझ्यापर्यंत पोहोचत होती. कधी मित्रांसोबत बारामतीला जाणं-येणं व्हायचं. तिथली माती, तिथली माणसं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार घराण्याचा दबदबा आणि प्रभाव जवळून अनुभवायला मिळायचा.
….त्या काळात अजितदादा पवारांविषयी एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. एक तरुण, तडफदार, अभ्यासू, निर्णयक्षम आणि राजबिंडा नेता म्हणून अजितदादांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आम्ही नकळत अजितदादांचे फॅन झालो होतो.
अजितदादांच्या जडणघडणीत माननीय शरद पवार साहेबांचा वाटा अत्यंत मोलाचा होता. केवळ राजकीय मार्गदर्शन नव्हे, तर खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पवार साहेबांनी निभावली होती. सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी शरद पवार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत असत. ते मुख्यमंत्री असताना अजितदादा खासदार म्हणून दिल्लीत काम करत होते. त्या काळात केंद्र-राज्य संबंध, संसदीय कामकाज, धोरणात्मक निर्णय, प्रशासनाची पायाभूत रचना यांची सखोल जाण अजितदादांना मिळाली.
….यानंतर पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अजितदादांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःसोबत अधिक सक्रिय केलं. सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील बारकावे अजितदादांना समजावेत यासाठी त्यांना प्रत्यक्ष कामाच्या केंद्रस्थानी ठेवलं गेलं. मी स्वतः पाहिलं आहे, शरद पवार मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या केबिनलगतच अजितदादांची राज्यमंत्री म्हणून केबिन होती. मुख्यमंत्री म्हणून पवार साहेबांनी सही केलेली जवळपास प्रत्येक फाईल अजितदादांच्या हातून जायची. यामागचा उद्देश स्पष्ट होता प्रशासनाची प्रत्येक नाडी, प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक निर्णयाची जबाबदारी अजितदादांनी जवळून अनुभवावी. खऱ्या अर्थाने शरद पवारांच्या मुशीत घडलेलं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार.
अजितदादांचं व्यक्तिमत्त्व अतिशय वेगळं होतं. त्यांना कधीच तामझाम, झगमगाट, बॅनरबाजी आवडत नव्हती. हार-तुरे घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांवर ते अनेकदा रागावलेले मी स्वतः पाहिलं आहे. “कामासाठी या, दिखाव्यासाठी नाही,” ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. विनाकारण भेटायला आलेल्या लोकांवर ते तितक्याच स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत. पण जो माणूस काम घेऊन, प्रश्न घेऊन येईल, त्याला ते कधीच निराश करत नसत.
….एक तरुण, तडफदार, प्रशासनाची सखोल जाण असणारा, निर्णय घेण्याची हिंमत असणारा आणि महाराष्ट्राच्या विकासाची व्यापक दृष्टी असणारा नेता म्हणजे अजितदादा. जवळपास चाळीस वर्षे ते सक्रिय राजकारणात होते. इतक्या प्रदीर्घ काळात त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपलं आयुष्य घालवलं. अजितदादांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते सत्तेशिवाय राहू शकत नव्हते. कारण सत्ता ही केवळ पदासाठी नसून लोकांची कामं करण्याचं साधन आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता.
….तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेला, सरळ स्वभावाचा, कधी कधी रागीट वाटणारा पण आतून कार्यकर्त्यांविषयी प्रचंड तळमळ असलेला असा हा नेता साध्या कार्यकर्त्याच्या घरीही जेवायला जाणारा होता. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या निमंत्रणालाही मान देऊन कार्यक्रमाला हजर राहणारा नेता पुन्हा होणे कठीण आहे.
नुकतेच त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. अजितदादा बीडला येणार म्हटलं की संपूर्ण शहराला जणू एखाद्या समारंभाचं स्वरूप यायचं. जिल्हा प्रशासन खडबडून जागं व्हायचं. स्वच्छता, वाहतूक, शिस्त सगळं अलर्ट मोडवर जायचं. दादांचा मुक्काम असला की पहाटे कुठल्या ठिकाणी अचानक भेट देतील, कुठल्या कामाचा आढावा घेतील याचा नेम नसायचा. त्यामुळे प्रशासन कायम सज्ज असायचं.
….आज अजितदादांच्या अचानक आणि दुर्दैवी जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत प्रशिक्षित, सर्व क्षेत्रांत हातखंडा असलेला, राजकारण, अर्थकारण आणि प्रशासन यांची सखोल जाण असलेला मोठ्या उंचीचा नेता गमावला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांच्यानंतर अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संपूर्ण पिढीच जणू संपली आहे. ही पोकळी केवळ राजकारणातच नव्हे, तर सामान्य जनतेच्या मनातही कायम जाणवत राहील.
अजितदादा पवार हे केवळ एक राजकारणी नव्हते, ते एक संस्था होते. आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. मोठ्या अंतःकरणाने, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि कृतज्ञतेच्या भावनेने माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
तुमचं कार्य, तुमची तडफ आणि तुमचं नेतृत्व महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. 🙏.



