📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

संघरतन सरदार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत योजनेचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा उपलब्ध झाली असून १ ऑक्टोबरपासून उपचार सुरू होणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या योजनेअंतर्गत रुग्णालयांची सुविधा उपलब्ध असताना अंजनगाव सुर्जी तालुक्यात मात्र पात्र नागरिकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे तालुक्यातच योजनेअंतर्गत रुग्णालय उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत होती.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांनी २६ जुलै २०२३ रोजी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही हा प्रश्न शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. अखेर या मागणीची दखल घेत तालुक्यात योजनेअंतर्गत रुग्णालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्ट होते.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारासाठी आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत होऊ शकते.

तालुक्यातच सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पात्र रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज कमी होणार असून वेळ व प्रवासाचा खर्चही वाचणार आहे. आपल्या मागणीची दखल घेऊन सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संघरतन सरदार यांनी संबंधित आरोग्य विभाग व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

आता या योजनेचा लाभ अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पात्र गोरगरीब रुग्णांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button