राजकीय

‘जरंडेश्वर’ची माहिती देण्यास सातारा जिल्हा बँकेचा खासदार उदयनराजेंना नकार

 

सातारा |जरंडेश्वर कारखान्याच्या मुद्द्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्यायांनी थेट पवार कुटुंबियांवर हल्ला चढवला होता. त्यातच जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची आणि ईडीच्या चौकशीची लेखी माहिती जिल्हा बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे मागितली होती. ईडीने जी काही माहिती मागविली होती ती ईडीला देण्यात आली आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत संचालक मंडळाने उदयनराजे भोसले यांना ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

सद्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी सर्व पक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे ,रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यास अनेकांनी नकार दिला आहे. उदयनराजेंना सत्ताधारी पॅनल मधून उमेदवारी मिळाल्यास या निवडणुकीमध्ये सहज विजय मिळू शकतो.

याच पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंनी या कर्ज प्रकरणावर आक्षेप घेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती मागितली होती. यावेळी सरकाळे यांनी हा विषय २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकारी समितीपुढे ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगितले होते.

शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि यावेळी उदयनराजेंनी मागणी केलेल्या लेखी पत्रावर चर्चा झाली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर संचालक मंडळाने कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत काहीही माहिती देता येणार नाही. मात्र, आपल्याला जी माहिती हवी आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय संचालक मंडळांकडून घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

Back to top button