📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून संत वामनभाऊ महाराज पालखीचे आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत भक्तिमय प्रस्थान;

श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून संत वामनभाऊ महाराज पालखीचे आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत भक्तिमय प्रस्थान;
************************
आ. सुरेश धस यांनी पायी चालत विविध दिंडींचे केले स्वागत
**************
आष्टी (प्रतिनिधी)

आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून सोमवारी (दि. १३ जुलै) संत श्री वामनभाऊ महाराज यांच्या पारंपरिक पालखी-दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” आणि “विठ्ठल-रुक्मिणी”च्या अखंड नामघोषाने संपूर्ण गड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

प्रस्थानापूर्वी संत वामनभाऊ महाराजांच्या पावन पादुकांचे विधिवत पूजन, दुग्धाभिषेक, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाआरती यांसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

यावेळी आष्टी-पाटोदा-शिरूर (कासार) मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या पादुकांचे पूजन करून समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुखरूप, मंगलमय आणि भक्तिरसपूर्ण वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

गहिनीनाथ गडावरील पालखी प्रस्थानानंतर आमदार धस यांनी स्वतः पायी चालत विविध दिंडींमध्ये सहभागी होत वारकरी बांधवांचे स्वागत केले. मांजरसुंबा येथे श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरपूरकडे निघालेल्या सुमारे ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री संत मुक्ताबाई पालखी रथ पायी दिंडी सोहळ्यास त्यांनी भेट दिली. यावेळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. पंकज महाराज पाटील आणि ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी मार्गस्थ झाली होती. धनंजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पाटोदा शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथून पंढरपूरकडे निघालेल्या सुमारे ८५० वर्षांची परंपरा लाभलेल्या पालखी-दिंडी सोहळ्यालाही आमदार धस यांनी भेट देऊन वारकरी बांधवांचे स्वागत केले. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मार्गस्थ झाली होती. पाटोदा शहरातील नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी प्रस्थान सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. भक्ती, शिस्त, समता, सेवा, प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, विविध गावांतील भक्तगण, वारकरी बांधव तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button