मुंबईचे उद्योगपती छगनराव खटके पाटील यांची पाटोदा शाळेस मोठी देणगी

मुंबईचे उद्योगपती छगनराव खटके पाटील यांची पाटोदा शाळेस मोठी देणगी
जामखेड प्रतिनिधी: जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज ८ डिसेंबर २०२५ रोजी पाटोदा गावचे सुपुत्र तसेच माजी सरपंच व मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि राज्यस्तरीय लोकसंसद जीवन गौरव पुरस्कार विजेते छगनराव खटके पाटील कामानिमित्त गावात आले असता त्यांनी शाळेला विशेष भेट दिली. शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानाचा फेटा देऊन त्यांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला. मुलांनी स्वागतगीत आणि अभिनंदन गीताने वातावरण भारून टाकले.
मितभाषी, बुद्धिमान आणि हळव्या मनाचे छगनराव खटके पाटील यांनी शाळेचा परिसर, उपक्रम आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी छगनराव खटके पाटील व मुख्याध्यापक उत्तम पवार यांच्या चर्चेदरम्यान शाळेतील भौतिक अडचणी आणि आवश्यक बाबी मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी मांडल्या. त्यावर खटके पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता शाळेसाठी स्टेज व त्यासाठी पत्र्याचे शेड देण्याची तयारी दर्शवली. बांधकाम मिस्तरी ला बोलावून खर्च काढून कामाची तातडीने अंमलबजावणीही सुरू केली. याआधी त्यांनी शाळेतील बोअरवेलला मोटर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, ज्यामुळे परिसर हिरवागार आहे.
मुख्याध्यापक उत्तम पवार हे माजी विद्यार्थी संघटना आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यासाठी सतत जनजागृती करत आहेत. यावेळी खटके पाटील म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता, संगणक ज्ञान, पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच खेळाचे मैदान यावरही लक्ष दिले पाहिजे. त्यांनी स्वतःच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी विद्यार्थ्यांसमोर उलगडली – शिक्षकी पेशापासून गिरणी कामगार, तिथून पुढे स्वतःचा व्यवसाय उभारून आज कापड उद्योग आणि स्पेअर पार्ट निर्मितीचे मोठे कारखाने उभे करणाऱ्या त्यांच्या वाटचालीने सर्वांना प्रेरणा मिळाली.
पाटोदा गावचे माजी सरपंच समीरभाई पठाण यांनी सांगितले की, गावाच्या विनंतीला छगनराव खटके पाटील यांनी नेहमीच तत्परता दाखवली असून यावेळीही स्टेज आणि शेड उभारण्याचे त्वरित वचन देऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली.त्यांच्या या कार्याला मनापासून आभार व कौतुक
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच अशोक महारनवर, माजी सदस्य दिनकर टापरे,सचिन टापरे, जमीर सय्यद, पापाभाई पठाण, विकास महारनवर, बाबू महारनवर, पोस्टमास्तर गोरख राजगुरू, सचिन पारे, आण्णासाहेब मोरे, आशाताई गव्हाणे तसेच शिक्षक जितेंद्र आढाव, संतोष डोके, अनिल आष्टेकर, रासने मॅडम आणि ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल आष्टेकर यांनी केले तर आभार संतोष डोके यांनी मानले.



