महाराष्ट्र

डासांमुळे प्र.क्र.2 मधील नागरिक हैराण; डास प्रतिबंधक फवारणीसाठी नगरसेवक सुयोग खाडे आक्रमक

पंकज हिरुळकर / प्रतिनिधी : अंजनगाव सुर्जी शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक सुयोग उत्तमराव खाडे यांनी नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक सुयोग खाडे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाग क्रमांक २ मधील गणेश नगर, शिक्षक कॉलनी, शहानूर कॉलनी परिसर, संगई प्लॉट, सहारा नगर, शिवाजी नगर, अंबिका नगर, पुर्वा नगर, गणपती नगर, चिंतामणी नगर, तंवर नगर, केशव नगर, अण्णाभाऊ साठे नगर, सिव्हील लाईन, रुपलाल नगर, झांझनपुरा तसेच मार्केट लाईन परिसरातील नवीन बसस्थानक, स्टेट बँक परिसर, लेंधे कॉम्प्लेक्स आणि संगई शाळा नाका या भागांमध्ये उघड्या नाल्या व साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असल्याचे नमूद केले आहे.

अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी उघड्यावर वाहत असून ते ठिकठिकाणी साचत असल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना ताप, डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने नगर परिषद प्रशासनाने तातडीने मच्छर प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी तसेच संपूर्ण शहरात नियमित फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणीही नगरसेवक सुयोग खाडे यांनी केली आहे.

शहरातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई व डास प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button