श्री नागेश्वर मंदिराजवळील पुल पुन्हा उभारण्याची सुरेखा सदाफुले यांची प्रथम मागणी

श्री नागेश्वर मंदिराजवळील पुल पुन्हा उभारण्याची सुरेखा सदाफुले यांची प्रथम मागणी
सभापती प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांना निवेदन
जामखेड | प्रतिनिधी :
जामखेड शहरातील श्री नागेश्वर मंदिराजवळील लोखंडी पुल अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाची नव्याने व भक्कम पद्धतीने उभारणी करण्यात यावी, अशी प्रथम मागणी शहरातील दिशा सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सुरेखा अनिल सदाफुले यांनी दि.३० ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे केली होती.
जामखेड शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री नागेश्वर मंदिराजवळ नव्याने बांधण्यात आलेला लोखंडी पुल कमकुवत होऊन वाहून गेला.
या पुलामुळे पोलीस स्टेशन तसेच परिसरातील नागरिकांची ये-जा सुलभ होत होती. तसेच पादचारी नागरिकांसाठीही हा पुल मोठा दिलासा देणारा ठरला होता. मात्र पुल वाहून गेल्याने सध्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
नवीन पुलाचे बांधकाम करताना तो खर्डा रोडला जोडणाऱ्या रस्त्याशी संलग्न करण्यात यावा आणि मजबूत पद्धतीने उभारण्यात यावा, जेणेकरून त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची वाहतूकही सुरळीत होऊ शकेल, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, श्री क्षेत्र तुळजापूर येथील देवीचा पलंग नवरात्र उत्सवाच्या काळात याच मार्गाने जात असतो. मात्र पुल नसल्याने यावर्षी पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा पलंग दुसऱ्या मार्गाने न्यावा लागला. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी या ठिकाणी भक्कम पुल उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर दिशा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सुरेखा अनिल सदाफुले यांनी ही मागणी तहसीलदार तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती.



