बीड

जलदगती चाचणी झाली पण इलेक्ट्रीक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावेना ; सदोष रेल्वेपुल प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे

जलदगती चाचणी झाली पण इलेक्ट्रीक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावेना ; सदोष रेल्वेपुल प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- ( दि.२८ ) बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा अहिल्यानगर -बीड- परळी लोहमार्ग पुर्णत्वाकडे जात असुन रेल्वे रूळ अंथरणे, रेल्वे स्टेशन उभारणीचे कामही मार्गी लागले असले तरी या मार्गावर इलेक्ट्रिक जोडणीचे काम रखडलेले असल्याने जलदगती चाचणी होऊनही बीडला रेल्वे कधी धावणार? असा प्रश्न बीडकरांना पडला आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसह च-हाटा रोडवरील पालवण फाटा येथील पावणे ३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पुल पाडण्याचे काम सुरू आहे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असुन संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी व तसेच बहुतांश रेल्वे पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना वाहतुकीची अडचण येते त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना करावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८  सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, सुदाम तांदळे , पांडुरंग  हराळे,अशोक येडे जिल्हाध्यक्ष (आप), रामधन जमाले जिल्हाध्यक्ष( इंटक), जरांगे पाटील, किष्किंधा पांचाळ , शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील आदी सहभागी होते.

जलदगती चाचणी झाली परंतु इलेक्ट्रीक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावेना
—-
बीड रेल्वेसाठी गेल्या ४० वर्षांपासून स्वातंत्र्य सैनिक ,रेल्वे मागणी  आंदोलन समिती, रेल्वे कृती संघर्ष समिती, अनेक नागरीक युवा कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. वेळप्रसंगी आंदोलकांना जेलमध्येही जावे लागले आहे.
अहिल्यानगर – बीड – परळी या २६१ किलोमीटर रेल्वे मार्गावरील ८० टक्के रेल्वे रूळ अंथरण्याचे आणि रेल्वे स्टेशन उभारणीचे काम कामही मार्गी लागले आहे. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी बीड स्थानकापर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील इलेक्ट्रीक जोडणी काम अद्याप पूर्ण मार्गावर झालेले नाही हे काम पूर्ण झाल्यानंतरच नियमित रेल्वे सुरू होऊ शकते.सध्या विघनवाडी पर्यंत काम पूर्ण झालेले आहे. ईलेक्ट्रीक जोडणी
अभावी बीडला रेल्वे धावण्याचे काम रखडले असुन या कामाला गती देऊन तातडीने पूर्ण करण्यात यावे.

दिशा चुकली म्हणून पावणे तीन कोटींचा पुल पाडला; पुल पाडण्यासाठी २० लाखाचा खर्च आणि नविन पुलासाठी १५ कोटी  संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी

बीड तालुक्यातील च-हाटा रोडवरील पालवण फाटा येथील २ कोटी ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला पुल लोहमार्गाची व पुलाची दिशा यांचा अंदाज चुकल्याने निरुपयोगी ठरला असुन रेल्वे पुल पाडण्याचे काम सुरू आहे. आता पुल पाडण्यासाठी २० लाख रुपये खर्च असुन नविन पुल बांधण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
जनतेच्या पैशाचा अपव्यय असुन संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित रेल्वे विभागाचे अभियंता आणि लोहमार्ग पुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून नुकसान भरपाईची रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी

पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली पाणी साचत असल्याने ग्रामस्थांची वाहतुकीची अडचण ; उपाययोजना करण्यात यावी

बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर -बीड- परळी या रेल्वे मार्गावरील रेल्वे पुलांची पाहणी करुन पुलाखालचे पाणी काढुन देण्याची व्यवस्था न केल्याने पाणी साचत असुन बीड तालुक्यातील पालवण चौक,नवगण राजुरी,जरूड,बाभुळखुंटा येथील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने ग्रामस्थांची वाहतुकीची अडचण होत असुन  संबंधित प्रकरणी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी .

Back to top button