अहिल्यादेवींचे विचार अंगीकारणे काळाची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यादेवींचे विचार अंगीकारणे काळाची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जन्मभूमी चौंडीत अहिल्यादेवी जयंतीचा भव्य सोहळा
जामखेड प्रतिनिधी ३१ :- लोककल्याण, न्यायनिष्ठा आणि समाजप्रबोधनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मूल्ये जनमानसात रुजविली. अंधश्रद्धेला विरोध करत त्यांनी समाजाला प्रगतीची दिशा दिली.
त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आजच्या समाजाने अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रामराव वडकुते, आमदार सर्वश्री काशिराम दाते, मोनिका राजळे, सुनील कर्जतकर, गोपीचंद पडळकर, विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, हेमंत ओगले, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, सचिन कांबळे, तसेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राचा अभिमान, शौर्य, त्याग व समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत. चौंडीची माती त्यांच्या जन्माने पावन झाली आहे.अहिल्यादेवी या दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्या होत्या. त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे आदर्श राज्यकारभार केला. देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार स्वतःच्या निधीतून केला.त्यांनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली.राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करताना त्यांनी लोकसेवा आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःसाठी धनखर्च न करता समाजकल्याणासाठी संपत्तीचा उपयोग केला. त्यामुळेच त्यांना ‘लोकमाता’ म्हणून ओळखले जाते. गोदा ते नर्मदा या अहिल्यादेवी जलयात्रेचा शुभारंभ यावर्षी चौंडी येथून करण्यात आला.
प्रास्ताविकात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे विशेष महत्त्व आहे. जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर लोककल्याण, न्यायनिष्ठ प्रशासन आणि समाजहितासाठी कार्य केले.यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले.



