देशविदेश

“संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का, फडणवीसांनी लगावला टोला

 

ड्रग्स पार्टीवर टाकण्यात आलेल्या धाडीवरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. त्यातच मलिक रोज पत्रकार परिषेद घेऊन समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मलिक यांना पाठिंबा दिला होता. याच मुद्दयावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राला ज्याप्रमाणे ड्रग्जचा विळखा पडला आहे, तरुणाई बर्बाद होतेय, त्याविरुद्ध लढायच्या ऐवजी संजय राऊतांसारखे लोकं त्यांना समर्थन देत असतील, तर आपण म्हणतो ना की, ईश्वरच मालक आहे, अशीच परिस्थिती निर्माण होईल. परंतु, मला त्यांना उत्तर द्यायची इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की, मूळ मुद्द्यांपासून सगळ्या गोष्टी, सगळे लक्ष भटकले पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात इतका भयानक पाऊस झाला. शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट झाली. त्यांना एक नवा पैसा मिळालेला नाही. त्याहीबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना काय उत्तर द्यावे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Back to top button