शेतकरी मुलांना प्राधान्य द्या,ग्रामीण विवाह संस्कृती बळकट करा : संतोष पवार

शेतकरी मुलांना प्राधान्य द्या,ग्रामीण विवाह संस्कृती बळकट करा : संतोष पवार
शेतकरी मुलांच्या विवाहासाठी जिव्हाळा फाऊंडेशनची मोहीम
जामखेड प्रतिनिधी : एकाच गावातील शेतकरी मुलगा व गावातील शेतकरी मुलगी यांचा विवाह झाल्यास जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने ५१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. शहरातील भौतिक सुखाच्या मागे धावण्यापेक्षा समाधान, संस्कार आणि नातेसंबंधांना महत्त्व देणे आवश्यक आहे.असे मत जिव्हाळा फाऊंडेशन चे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील शिऊर येथे रविवार (दि. ३१) रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे आयोजित “चला सकारात्मक विचारांनी ग्रामीण जीवनात विवाह संस्कृतीला नवीन दिशा देऊया” या ब्रीदवाक्यानुसार राबविण्यात आलेल्या ‘शेतकरी विवाह जागृती अभियान’ अंतर्गत “जागर लोकशाहीचा” या विशेष उपक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिऊरचे माजी सरपंच भास्करराव काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर राळेभात, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, उद्योगपती गुलाब जांभळे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण, प्रा. आबासाहेब वीर, एकनाथ चव्हाण, उद्योजक विकास पवळ, व्यापारी सुनील उगले, प्रा. कुंडल राळेभात, अशोक मुळे, माजी सरपंच भगवान देवकाते, नामदेव राळेभात, ऋषिकेश क्षिरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार यांनी शेतकरी विवाह संकल्पनेला पाठिंबा देताना महत्त्वाची घोषणा केली की,मुलांनी चारित्र्यसंपन्न राहून शेतीबरोबर जोडधंद्यालाही प्राधान्य दिले पाहिजे. गावातील मुलींची गावीच लग्ने व्हावीत, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांशी नाते जोडावे आणि दोन्ही कुटुंबांनी सकारात्मक पाऊल उचलल्यास अनेक सामाजिक प्रश्न सुटू शकतात,असे ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात बोलताना म्हणाले,शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकऱ्यांशिवाय या देशाला कोणताही पर्याय नाही. येत्या काही वर्षांत याची जाणीव सर्वांना होईल. आज समाजाची मानसिकता बदलली आहे. मात्र आपल्या मुलींनीही शेतीची ओळख ठेवावी, शेतात काम करण्याची तयारी आणि मानसिकता असावी. कुचकामी लोकांच्या घरात मुली देण्यापेक्षा कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुलांना मुली देण्यासाठी समाजाने जागरूक होण्याची गरज आहे,
आज हजारो पालक आपल्या मुलांसाठी योग्य वधू शोधण्याच्या अपेक्षेने संपर्क साधत आहेत. शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये कष्ट, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव असते. त्यामुळे समाजाने शेती आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
यावेळी गुलाब जांभळे, शिवाजीराव ढाळे, माजी सरपंच भगवान देवकाते, नामदेव राळेभात आणि ऋषिकेश क्षिरसागर यांनीही मनोगते व्यक्त करून शेतकरी विवाह जागृती अभियानाच्या संकल्पनेचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब जांभळे यांनी केले. सूत्रसंचालन राम निकम यांनी तर आभार प्रदर्शन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.
चौकट
शेतकरी विवाहाला ५१ हजारांचे प्रोत्साहन
————————————————–
विवाह संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी जिव्हाळा फाऊंडेशनने एकाच गावातील शेतकरी मुलगा व शेतकरी मुलगी यांच्या विवाहासाठी ५१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. या उपक्रमामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये विवाहासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



