बीड

तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावला; मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी ८ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन!

तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावला; मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी ८ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन!
​आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकारात्मक संकेत; शिवसेना शिष्टमंडळाच्या भेटीला यश
​श्रीवर्धन (संदेश घोलप):
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तडफडणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या नळपाणी योजनेचा त्रास सहन करणाऱ्या श्रीवर्धनकरांसाठी अखेर अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. श्रीवर्धन शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आणि वेळोवेळी फुटणारी मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असून, यामुळे शहरवासीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
​श्रीवर्धन शहराचा पाण्याचा प्रश्न २४ कोटींच्या पाणी योजनेच्या बोजवाऱ्यामुळे आणि सतत फुटणाऱ्या पाईपलाईनमुळे अत्यंत बिकट झाला होता. यामुळे लाखो लीटर शुद्ध पाणी दररोज रस्त्यावर वाहून जात होते आणि नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्रीवर्धन येथील नगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आणि शिवसेना शहरप्रमुखांच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने महाड-पोलादपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. भरतशेठ गोगावले साहेब यांची तातडीने भेट घेतली आणि श्रीवर्धनकरांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
​परिस्थितीचे गांभीर्य आणि नागरिकांचे हाल लक्षात घेऊन आमदार गोगावले साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी श्रीवर्धनच्या पाणी समस्येची तीव्रता मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्य जलवाहिनी संपूर्णपणे बदलण्यासाठी ८ कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे खात्रीदायक आश्वासन दिले असल्याची माहिती श्रीवर्धन नगरपालिकेचे गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना दिली.
​”श्रीवर्धनची जनता पाण्यासाठी अत्यंत हालअपेष्टा सहन करत होती. निकृष्ट कामामुळे मुख्य पाईपलाईन सतत फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होत होता. मात्र, आमच्या शिष्टमंडळाने मा. भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेताच, त्यांनी श्रीवर्धनकरांच्या सुटकेसाठी थेट ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन आणले आहे. तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी हा खूप मोठा दिलासा असून खऱ्या अर्थाने जनतेसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावून आला आहे.”
— देवेंद्र भुसाणे (गटनेते, श्रीवर्धन नगरपालिका)
​या ८ कोटींच्या निधीचे आश्वासन मिळाल्यामुळे अबालवृद्धांचे हाल थांबणार असून, श्रीवर्धनमधील गळक्या, जीर्ण आणि फुटक्या पाईपलाईनचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर या निधीच्या मंजुरीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
Back to top button