📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आ.नमिता मुंदडांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी ८ कोटी ६३ लाख निधीची मागणी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी तरनळी येथील सानप वस्ती शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :- डॉ. गणेश ढवळे

आ.नमिता मुंदडांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी ८ कोटी ६३ लाख निधीची मागणी
शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी तरनळी येथील सानप वस्ती शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :- डॉ. गणेश ढवळे
बीड:- (दि.२८) शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन काही दिवस होत नाहीत तोच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि.१५ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह १०० अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले असतानाच दुसरीकडे शाळांच्या इमारतींची धोकादायक अवस्था समोर आली आहे.
केज आणि अंबेजोगाई विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इमारत विरहित शाळा, मोडकळीस आलेल्या इमारती, अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून एकूण ८ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केज तालुक्यातील २४४ जिल्हा परिषद शाळांपैकी ९ शाळा इमारतविरहित असून ९ शाळांमधील ११ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. विद्यार्थी संख्या वाढल्याने ७ शाळांमध्ये ८ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. एकूण २५ शाळांमधील २८ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ३ कोटी ३० लाख रुपये, तर २९ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ७९ लाख रुपये, असा एकूण ४ कोटी ९ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच अंबेजोगाई तालुक्यातील १७५ जिल्हा परिषद शाळांपैकी ४ शाळा इमारतविरहित आहेत. ९ शाळांमधील २३ वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून विद्यार्थी संख्या वाढल्याने ३ शाळांमध्ये ४ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. एकूण १६ शाळांमधील ३१ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ३ कोटी ७२ लाख रुपये, तर १७ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ८२.५० लाख रुपये, असा एकूण ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.
शाळांच्या धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत असून तातडीने निधी उपलब्ध करून सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२
Back to top button