बीड

चिंचोली माळी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचा मनमानी कारभार- उपसरपंच गीता वनवे

चिंचोली माळी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचा मनमानी कारभार- उपसरपंच गीता वनवे
केज/प्रतिनिधी :-केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचा मनमानी कारभार चालू आहे अशा आशयाचे लेखी निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती केज यांना उपसरपंच गीता वनवे यांच्यासह ६ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच मिळून संगणमत आणि मासिक बैठक,ग्रामसभा तसेच विकास कामे बोगस करत आहेत. मागील महिन्यातील मासिक बैठक दिनांक 28 8 2025 रोजी होती परंतु सरपंच हे बैठकीचे अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे सदर बैठक ही ग्रामपंचायत अधिकारी यांनी घेतली नाही. सदर बैठकीस सर्व मेंबर उपस्थित असताना सुद्धा बैठक रद्द केली व नंतर लगेच दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामसभा आयोजित केली. परंतु या ग्रामोसभेची नोटीस सदस्यांना व्हाट्सअप द्वारे दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पाठवण्यात आली व ती घेतली. सदर ग्रामसभेची नोटीस ही दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आली होती वास्तविक पाहता ग्रामसभेच्या अगोदर मासिक बैठक न घेता ग्रामसभेची नोटीस काढण्यात आली व ग्रामसभा घेण्यातही आली ही बाब बेकायदेशीर आहे असे असताना सुद्धा व रद्द झालेली मासिक बैठक नंतर घेण्यात आली नाही अशा प्रकारे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच ग्रामसभा घेऊन कायद्याची पायमल्ली करत आहेत. याच प्रकारे ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांमध्ये सारूक वाडी येथील दलित वस्तीचा आठ लाख रुपयाचे बोगस बिल मागील वर्षी उचलण्यात आले आहे. वार्ड क्रमांक एक मधील बंदिस्त नाली असो, ९०-१० चे काम असो व अन्य असे अनेक कामे बोगस व निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत.
सदर बाबी तपासण्याकरिता ग्रामपंचायत चिंचोली माळी चे रेकॉर्ड तात्काळ ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी व जानेवारी 2023 नंतर झालेल्या सर्व ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाची गुणवत्ता विभागाकडून त्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी व बेकायदेशीर रित्या घेण्यात आलेले ग्रामसभा रद्द करण्यात यावी व संबंधितावर योग्य ती कारवाई दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी या मागणीच्या लेखी निवेदनाच्या प्रती गट विकास अधिकारी पंचायत समिती केज, तहसीलदार केज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग केज यांना देण्यात आलेल्या आहेत. जर प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही तर  आम्ही गावकऱ्यासहित श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर चिंचोली माळी येथे आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
या लेखी निवेदनावर उपसरपंच सौ. गीता धीरज वनवे, ग्रामपंचायत सदस्य सौ.भाग्यश्री अशोक शिंदे,सौ. शोभा संजय नखाते, रमेश चंद्रकांत देशमुख, सुरज अशोक गायकवाड, अजीज आज आजमुद्दीन शेख, प्रकाश विश्वनाथ गालफाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Back to top button