बीड
भुतवडा तलावातून पाणी उपसा सुरू; पाच विद्युतपंप कार्यान्वित

भुतवडा तलावातून पाणी उपसा सुरू; पाच विद्युतपंप कार्यान्वित
१५ टँकरच्या दररोज ३० खेपांचे नियोजन; शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर
जामखेड प्रतिनिधी : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. भुतवडा तलावातून चार सिंगल फेज व एका थ्री फेज अशा पाच विद्युतपंपांच्या साहाय्याने पाणी उपसा सुरू असून, जामखेड शहराच्या पाण्याच्या टाकीत पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात आहे. दररोज मुख्य जलकुंभ भरला जात असल्याने शहराचा रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरू ठेवण्यास मदत होत आहे.
शहराबाहेरील वाड्या-वस्त्यांनाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १५ टँकरच्या माध्यमातून दररोज ३० खेपा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मांदळी येथे टँकर भरण्यासाठी दोन स्वतंत्र पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाणी उपसा आणि वितरण व्यवस्थेवर नगरपरिषद प्रशासन लक्ष ठेवून आहे.
सध्याची पाणीटंचाई ही नैसर्गिक परिस्थिती आहे. अशा संकटाच्या काळात राजकारण करण्याऐवजी सर्वांनी नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले.
जामखेडकरांना नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.



