बीड
श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याचा हैदोस; वडघरमध्ये गायीवर जीवघेणा हल्ला, प्रशासन अजून किती बळींची वाट पाहतंय?

श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याचा हैदोस; वडघरमध्ये गायीवर जीवघेणा हल्ला, प्रशासन अजून किती बळींची वाट पाहतंय?
श्रीवर्धन(संदेश घोलप ) गेल्या दोन-तीन महिन्यांपासून श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली असून, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आता नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे. तालुक्यातील वडघर येथे बिबट्याने थेट लोकवस्तीत घुसून एका गायीवर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी संध्याकाळी ७ ते ८ च्या सुमारास वडघर येथील शेतकरी बबन सालदुरकर यांच्या गोठ्यात बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याने थेट गायीच्या तोंडावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. गायीच्या ओरडण्यामुळे घरातील लोक आणि आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ धावून आले. नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र या हल्ल्यात गायीच्या तोंडावर खोल जखमा झाल्या आहेत. सुदैवाने ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाची भूमिका: ‘घोडं अडलंय कुठे?’
वडघरसह करिवणे, जावेळे, वडशेत वावे, धारवली कोलमांडले आणि मधला वडघर या गावांमध्ये बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही वन विभाग आणि स्थानिक प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“आज गायीवर हल्ला झाला, उद्या एखाद्या माणसाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
१. तात्काळ पिंजरा लावा: वडघर आणि परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्यात यावा.
२. रात्रीची गस्त वाढवा: वन विभागाने रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालून नागरिकांना सुरक्षा द्यावी.
३. नुकसानभरपाई: पीडित शेतकरी बबन सालदुरक यांना त्यांच्या जखमी गायीच्या उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी.
४. सर्तकता यंत्रणा: गावात सीसीटीव्ही किंवा इतर सर्तकता यंत्रणा कार्यान्वित करावी.
अंतिम इशारा
प्रशासनाने जर वेळीच दखल घेतली नाही आणि बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर श्रीवर्धनमधील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बिबट्याच्या दहशतीखाली जगायचं किती दिवस? असा प्रश्न आता प्रत्येक घराघरातून विचारला जात आहे.



