जामखेडमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या हद्द निश्चितीला सुरुवात

जामखेडमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या हद्द निश्चितीला सुरुवात
पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू, नागरिकांमध्ये समाधान
जामखेड प्रतिनिधी :
गेल्या तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली असून, बुधवार (दि. १ एप्रिल) पासून हद्द निश्चितीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे धूळ, खाचखळगे आणि वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग रखडल्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी यापूर्वी उपोषण आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने हद्द निश्चिती करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार धनंजय बांगर यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला गती दिली आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद आणि तहसील विभागाने संयुक्तपणे मोजमाप करून हद्दखुणा निश्चित केल्या होत्या. मात्र, अतिक्रमणधारकांनी त्या मान्य न केल्याने खुणा पुसण्यात आल्या आणि प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडले होते.
दरम्यान, प्रकरण न्यायालयीन असल्याने हद्दखुणांशी छेडछाड केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार धनंजय बांगर यांनी दिला आहे. तसेच अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन लवकरच अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज पोलीस बंदोबस्तात महसूल विभाग, भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, भूमी अभिलेख अधिकारी गिरीश आवारे, प्रविण भोकणळ तसेच राष्ट्रीय महामार्ग शाखेचे अभियंता दशरथ कासार आदी अधिकारी सहभागी झाले होते.
आता हद्द निश्चितीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.



