बीड

मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष  शेख जाकेर महेबुब यांना ‘मुस्लिम ओबीसी समाजभूषण नेतृत्व पुरस्कार’ जाहीर!

मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष  शेख जाकेर महेबुब यांना ‘मुस्लिम ओबीसी समाजभूषण नेतृत्व पुरस्कार’ जाहीर!

समाज संघटन आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठीच्या लढ्याचा २० जून रोजी बीडमध्ये होणार सन्मान

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्हा मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष शेख जाकेर महेबुब यांना यंदाचा मानाचा ‘मुस्लिम ओबीसी समाजभूषण नेतृत्व पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि ६ व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ‘युवा लोकमित्र परिवार’च्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने त्यांच्या नावाची एकमुखाने अधिकृत घोषणा केली आहे.साप्ताहिक युवा लोकमित्र’ आणि ‘युवा लोकमित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध क्षेत्रांत उल्लेखनीय, आदर्शवत व प्रदीर्घ कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येतो.  निवड समितीने समाज संघटन, वंचित घटकांचे कल्याण आणि समाजाला खंबीर नेतृत्व देण्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी शेख जाकेर महेबुब यांची या विशेष पुरस्कारासाठी निवड केली आहे.शेख जाकेर महेबुब यांनी बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, आरक्षणाच्या जागृतीसाठी आणि सामाजिक चळवळींना बळकट करण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘बीड जिल्हा मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गरजू आणि वंचित घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. केवळ पदापुरते मर्यादित न राहता, मुस्लिम समाजातील मागास आणि दुर्बल घटकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून  त्यांची मोठी ओळख आहे.
समाजातील युवकांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, त्यांच्यात हक्कांविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन व उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या याच समाजसेवा, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या विशेष ‘नेतृत्व पुरस्काराने’ गौरविण्यात येत आहे.
हा दिमाखदार गौरव सोहळा येत्या शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  शेख जाकेर महेबुब यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच बीड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मुस्लिम ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button