बीड

“१० वी पास अट ठेवूनही पदवीधारकांना प्राधान्य? पोलिस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!”

“१० वी पास अट ठेवूनही पदवीधारकांना प्राधान्य? पोलिस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!”
प्रतिनिधी | लक्ष्मण घायतिडक
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस पाटील पदभरती प्रक्रिया 2026 संदर्भात प्रशासनाच्या निकषांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने किमान शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण अशी ठेवूनही मुलाखतीच्या गुणांकनात १२ वी व पदवीधारक उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याची तरतूद केल्याने ग्रामीण भागातील अनेक १० वी पास उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या पत्रानुसार लेखी परीक्षा पार पडली असून, आता तोंडी परीक्षा व मुलाखतीदरम्यान अंतिम गुणांकन करण्यात येणार आहे. मात्र या गुणांकनाच्या तक्त्यात १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ३ गुण आणि पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्या उमेदवारांना आणखी ३ गुण देण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे फक्त १० वी पास असलेल्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच गुणांच्या स्पर्धेत मागे टाकले जात असल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक उमेदवारांचा सवाल आहे की, जर १० वी हीच किमान पात्रता असेल तर त्यापुढील शिक्षणाला वेगळे गुण देण्याची गरज काय? अशा पद्धतीमुळे १० वी पास उमेदवारांसाठी ही भरती केवळ औपचारिक ठरते का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
याशिवाय उमेदवारांकडून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे. १२ वी उत्तीर्ण व पदवीधारक उमेदवारांना शासन व खासगी क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात, तर केवळ १० वी पास असलेल्या युवकांसाठी अशा संधी फार मर्यादित असतात. त्यामुळे पोलिस पाटीलसारख्या पदासाठी १० वी पास उमेदवारांना समान संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच पोलिस पाटील हा गावपातळीवरील महत्त्वाचा पदाधिकारी असून त्यासाठी स्थानिक परिस्थितीचे ज्ञान, समाजाशी संवाद आणि जबाबदारीची जाणीव अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे केवळ शैक्षणिक पात्रतेवर जास्त भर देणे योग्य आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केला असला तरी १० वी पास उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी गुणांकन पद्धतीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. अन्यथा ही भरती प्रक्रिया भविष्यात वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Back to top button