📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गेवराईत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

गेवराईत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
संघटन मजबूत करण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यावर भर – भाऊसाहेब चौधरी
गेवराई (सूर्योदय न्यूज) — शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करून पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच आगामी काळातील संघटनात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुनर्बांधणी करणे, या उद्देशाने गेवराई येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. शिवसेनेचे मध्यवर्ती सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
बैठकीत गेवराई तालुका व शहरातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षवाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब चौधरी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. शिवसेना हा जनसेवेचा विचार घेऊन काम करणारा पक्ष असून हा विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे त्यांनी सांगितले.
नवीन जबाबदाऱ्या व पदभाराचे वितरण
पक्षाचे काम अधिक गतिमान व्हावे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळावी, यासाठी बैठकीत विविध नवीन जबाबदाऱ्या व पदभार सोपविण्यात आले. नव्याने जबाबदारी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका व तत्त्वे जपत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
चंद्रकांत आप्पा नवले यांचे मार्गदर्शन
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत आप्पा नवले यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात पक्षसंघटना वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते घेत असलेल्या परिश्रमांचा आढावा घेतला. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करून पक्षाचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुकेश महाजन यांनी मांडला शहर संघटनेचा आढावा
शिवसेना शहरप्रमुख मुकेश महाजन यांनी गेवराई शहर व परिसरातील पक्षसंघटनेचा सविस्तर आढावा सादर केला. शहरात एकूण २६ बूथ असून शाखा व BLO-2 स्तरावरील नियोजनांतर्गत एकूण ४०४ बूथ प्रमुखांची नियुक्ती पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी आवश्यक नियोजनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पक्षात पद स्वीकारून प्रत्यक्ष काम न करणाऱ्या अथवा संघटनात्मक कार्यात निष्क्रिय राहणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा भाऊसाहेब चौधरी यांनी दिला. केवळ पद भूषविण्यापेक्षा पक्षासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना भाऊसाहेब चौधरी म्हणाले, “कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणे हीच शिवसेनेची खरी ओळख आहे. आगामी काळात संघटन अधिक लोकाभिमुख करून गेवराई तालुक्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.”
या बैठकीमुळे गेवराईतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले.
बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल भैया गलधर, जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, गेवराई तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button