बीड

बीड जिल्ह्यात खतांच्या काळाबाजाराविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

बीड जिल्ह्यात खतांच्या काळाबाजाराविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

अंबाजोगाई| प्रतिनिधी
खरीप हंगाम 2026 तोंडावर असताना बीड जिल्ह्यात रासायनिक खतांचा काळाबाजार, जादा दराने विक्री आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात दोषी खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल-मे 2026 मध्ये जुन्या एमआरपी दराने खरेदी केलेल्या खतांच्या साठ्यावर अनेक विक्रेते प्रति गोणी 400 ते 600 रुपये अधिक दर आकारत आहेत. डीएपी खताची शासकीय किंमत 1350 रुपये असताना ते 1750 रुपयांपर्यंत विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच युरियाची शासकीय किंमत 266.50 रुपये असताना कृत्रिम टंचाई निर्माण करून तो 400 ते 500 रुपयांना विकला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एमओपी आणि एनपीके 10:26:26 या खतांचीही एमआरपीपेक्षा 600 ते 800 रुपये अधिक दराने विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेने खत विक्रेत्यांकडून डीएपी किंवा युरियासोबत नॅनो युरिया, जैवखते व कीटकनाशके खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचाही आरोप केला आहे. याशिवाय बहुतांश दुकानांवर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार आवश्यक असलेले मराठी दरपत्रक लावण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे कृषी, महसूल आणि पोलीस विभागाचे संयुक्त भरारी पथक स्थापन करून सर्व खत विक्री केंद्रांवर अचानक तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. जादा दर आकारणारे, पावती न देणारे आणि लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, तसेच प्रत्येक तालुक्यात IFFCO ई-बाजार विक्री केंद्र सुरू करून युरियाचा काळाबाजार रोखावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, पुढील सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्री. कुलदीप करपे, सतीश भाऊ शिंदे, गुरुप्रसाद थळकरी आणि शुभम मऊत यांची स्वाक्षरी आहे.

Back to top button