बीड

माजलगाव तालुक्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या डोळ्यादेखत बेसुमार वाळू उपसा सुरूच!

माजलगाव तालुक्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या डोळ्यादेखत बेसुमार वाळू उपसा सुरूच!
गंगामसला परिसरात अवैध वाळू उपशाला उधाण; महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
 सुहास सावंत / माजलगाव
9301221111
माजलगाव तालुक्यातील गंगामसला परिसरात अवैध वाळू उपशाचा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी वाळूचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून संबंधितांकडून कोणाचीही भीती न बाळगता हा प्रकार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे नागरिक सांगतात; मात्र प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे बोलले जात आहे.
नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे पाणी पातळी, शेती आणि नैसर्गिक संपत्तीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच अशा प्रकारांमुळे गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण होत आहेत.
अवैध वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाची असताना, संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गंगामसला परिसरातील अवैध वाळू उपसा तातडीने थांबवावा, संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल व पर्यावरणाचे नुकसान रोखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Back to top button