महाराष्ट्र

राज्यस्तरीय सनक्रिस्टल गुणगौरव पुरस्कार 2026 ने नगरसेवक सुयोग खाडे सन्मानित

“अंजनगाव सुर्जीच्या भूमिपुत्राला राज्यस्तरीय सन्मान; समाजकार्यातील योगदानाची दखल”

अंजनगाव सुर्जी : समाजहिताची जाणीव, निस्वार्थ सेवा वृत्ती आणि गरजू, वंचित घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत अंजनगाव सुर्जी येथील समाजसेवक तथा नगरसेवक सुयोग उत्तमराव खाडे यांना “राज्यस्तरीय सनक्रिस्टल गुणगौरव पुरस्कार 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सनक्रिस्टल सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोणावळा-खंडाळा येथील वेल्वेट काउंटी रिसॉर्टमध्ये आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

सुयोग खाडे यांनी समाजसेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे अनेक गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांना आधार, मार्गदर्शन आणि नवजीवनाची प्रेरणा मिळाली आहे. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले योगदान प्रेरणादायी आणि गौरवास्पद असल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पुरस्कारासोबत त्यांना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गौरवपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानपत्रात “मानवतेची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे” या विचाराला अधोरेखित करत समाजहितासाठी केलेल्या त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

या राज्यस्तरीय सोहळ्यास महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील, पुणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, मुख्याध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सनक्रिस्टल सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष मंगलाजी मचाले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुयोग खाडे यांनी हा सन्मान जनतेच्या विश्वासाचा आणि समाजसेवेच्या कार्याला मिळालेल्या प्रेरणेचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली.

या यशाबद्दल अंजनगाव सुर्जी शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सुयोग खाडे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button