बीड
गोरगरिबांच्या अतिक्रमणावर हातोडा पण भूमाफियांना पायघड्या , शासकीय कर थकविणा-यांना मोकळीक – नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार :- डॉ.गणेश ढवळे

गोरगरिबांच्या अतिक्रमणावर हातोडा पण भूमाफियांना पायघड्या , शासकीय कर थकविणा-यांना मोकळीक – नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड :- ( दि.१० ) काल दि.०९ शनिवार रोजी नगरपालिका प्रशासनाने बीडमधील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी ३ तासात ५० गोरगरिबांच्या अतिक्रमणाच्या नावाखाली पोटावर पाय दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आले की नगरपालिकेकडुन शहरातील गोरगरिबांच्या चहाचे हातगाडे, टपरीधारक,छोटे मोठे दुकानदार, फळ विक्रेते,हातावर पोट भरणारे यांचे वाहतुकीस अडथळा ठरणारे अनाधिकृत अतिक्रमणाच्या नावाखाली पोटावर पाय देणारी नगरपालिका बीड शहरातील राखीव असलेल्या शहरातील खुल्या जागा काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हडपण्यात आल्या असुन त्यावर कधी कारवाई करणार तसेच नगरपालिका हद्दीतील ३२ शासकीय कार्यालयांकडे पालिकेचा तब्बल पावणे ३ कोटी रूपयांचा सरकारी कर थकला असुन कधी वसुल करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला असुन जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
उद्यान,मंदिरांसाठी राखीव (ओपन स्पेस) असलेल्या शहरातील खुल्या जागा हडपणा-यांवर कारवाई कधी??
—
प्लॉटिंग व बांधकाम करताना उद्यान , मंदिरासाठी राखीव असलेल्या शहरातील खुल्या जागा काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भुमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. विशेष म्हणजे नगरपालिका, नगररचनाकार, भूमी अभिलेख या तिन्ही कार्यालयातील व्यक्तींच्या मदतीने भूमाफिया आणि नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमताने या जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. बनावट पीटीआर, पीआर कार्ड देखील तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणी कधी कारवाई करणार असा सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयासह ३२ शासकीय कार्यालयांकडे थकलेला कर नगरपालिका कधी वसुल करणार?? – डॉ.गणेश ढवळे
—
बीड नगरपालिका हद्दीतील जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक, महावितरण, जिल्हा न्यायालय, बीएसएनएल , शासकीय कार्यालयांकडे पालिकेचा तब्बल २ कोटी ८७ लाख रुपयांचा कर थकला आहे यात पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय अशा प्रमुख कार्यालयांचा समावेश आहे यांच्याकडील थकीत कर नगरपालिका कधी वसुल करणार की केवळ गोरगरीब जनतेवर कारवाई करण्यातच मर्दुमकी गाजवणार असा सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी विचारला आहे.



