बीड
दुष्काळ व टंचाई निवारणार्थ प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात – आ. विजयसिंह पंडित

दुष्काळ व टंचाई निवारणार्थ प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात – आ. विजयसिंह पंडित
माजलगाव तहसिल कार्यालयात आ. विजयसिंह
पंडित यांची आढावा बैठक
माजलाव, दि.१६ (प्रतिनिधी) ः- संभाव्य तिव्र पाणी टंचाई आणि दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ अधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व विभागांसह पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेऊन उपाययोजना कराव्यात, ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी व पशुधनाला दिलासा देण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी असे प्रतिपादन करून दुष्काळग्रस्त जनतेची अडवणुक खपवून घेणार नाही असा इशारा आ. विजयसिंह पंडित यांनी दिला. त्यांच्या अध्यक्षतेखाली माजलगाव तहसिल कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. गेवराई विधानसभा मतदार संघातील तालखेड व टाकरवण जि. प. गटातील गावांच्या संदर्भाने पाणीपुरवठा, चारा, कर्जमुक्ती, नरेगा आदी विषयांचा त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. बैठकीला प्रशासनातील अधिकाऱ्यांसह संबंधित गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघातील तालखेड व टाकरवण या माजलगाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या मागणीवरुन आ. विजयसिंह पंडित यांनी सोमवार, दि.१६ नोव्हेंबर रोजी माजलगाव तहसिल कार्यालयात दुष्काळ व टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसिलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी ज्योत्सना मुळीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र अंभोरे, तालुका कृषी अधिकारी गणेश बादाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. घुबडे, अर्जुन नाईकनवरे, माजी जि. प. सदस्य शरद चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरावरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दोन्ही जिल्हा परिषद गटातील सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. सरपंचांनी आपआपल्या गावातील समस्या या बैठकीत मांडल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या आढावा बैठकीत आ. विजयसिंह पंडित यांनी अतिशय बारकाईने उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. काही विषयासंदर्भात त्यांनी थेट मंत्रालयीन अधिकाऱ्यांना फोन लावून विषय मार्गी लावले.
जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनेची कामे तात्काळ पूर्ण करा, टाकरवण ग्रामपंचायत अंतर्गत फुलसिंग तांडा व होनानाईक तांडा येथील नळ योजनेची दुरुस्ती करा, बाराभाई तांडा येथील पाण्याच्या टाकीची किरकोळ दुरुस्ती तातडीने करून तेथील नादुरुस्त हातपंप दुरुस्त करा, तालखेड ग्रामपंचायतीची अंतर्गत पाईपलाईन दुरुस्त करा यांसह आवश्यक तेथे मागणीनुसार विनाविलंब टँकर मंजुर करण्याचे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी दिले. पैठण उजव्या कालव्यातून वारोळा येथील गावतलाव आणि राजेगाव येथील तलावात पाणी सोडणेसंदर्भात जायकवाडी प्रशासनाला आ. पंडित यांनी निर्देश दिले. तालखेड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याच्या संदर्भाने पाठपुरावा करण्याचे आश्वासन या बैठकीत आ. पंडित यांनी दिले. एकदरा पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यवाच्या सूचना आ. पंडित यांनी दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाला समर्पक उत्तर न देता आल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून शेतकऱ्यांच्या के. वाय. सी. संदर्भातील अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. अनेक वयोवृध्द शेतकऱ्यांचे अंगठ्याचे ठसे के. वाय. सी. ला मॅच होत नसल्यामुळे त्यांचे आय स्कॅन करून के. वाय. सी. करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाने दिलेल्या दुष्काळी अनुदान अग्रीम वाटपाचा आढावा घेताना या भागातील सुमारे २७,०२४ शेतकरी वंचित असल्याची बाब निदर्शनास येताच आ. विजयसिंह पंडित यांनी थेट मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रालयीन सचिवांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून या बाबतच्या अडचणी सोडविण्याची विनंती केली.
पंचायत समितीस्तरावर शासकीय योजनांचे वैयक्तिक लाभ देताना कोणाचीही अडवणुक करू नका असा इशारा आ. विजयसिंह पंडित यांनी दिला. व्ही.बी.जी. रामजी रोहयो योजनेतून मागेल त्याला वैयक्तिक सिंचन विहिर तसेच जलतारा प्रकल्प राबविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश आ. पंडित यांनी दिले. घरकुल योजनेतील हप्ते वाटप करताना लाभार्थ्यांची अडवणुक होऊ नये या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पशुधनाच्या विमा संरक्षणा संदर्भात आ. विजयसिंह पंडित यांनी अतिशय गांभीर्याने घेत दूधाळ जनावरांसोबतच बैल, शेळी आदींना विमा संरक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रही सूचना यावेळी दिली. यासाठी लवकरच पशुसंवर्धन मंत्र्याची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हिवरा आणि बाराभाई तांडा याठिकाणी होत असलेला अवैध वाळू उपसा व वाहतुक बंद करणे संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी महसुल व पोलीस प्रशासनाला दिल्या. मायक्रो फायनान्स आणि खाजगी फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या सक्तिच्या कर्जवसुली बाबत चिंता व्यक्त करून आ. पंडित यांनी अशा कर्ज वसुली बाबत पोलीसांनी दुष्काळग्रस्त जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले.
आ. विजयसिंह पंडित यांनी माजलगाव तहसिल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत गेवराई विधानसभा मतदार संघातील तालखेड व टाकरवण जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या समस्यांचे मोठ्या प्रमाणावर निराकरण करण्यात आले. दुष्काळ आणि टंचाई या संदर्भाने ही बैठक महत्वपूर्ण ठरली. बैठकीला महावितरण, सहकार, राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा, पंचायत समिती, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल, कृषी यांसह सर्व विभागांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीला उपस्थित होते. तालखेड व टाकरवण जि. प. गटातील सर्व गावचे सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()



