राज्यातील समाजमाध्यमावर सांस्कृतिक कला केंद्राची चाललेली बदनामी थांबवा

राज्यातील समाजमाध्यमावर सांस्कृतिक कला केंद्राची चाललेली बदनामी थांबवा
३० हजार कलावंतांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न; राज्य सरकारकडे कलावंतांची विनंती
जामखेड प्रतिनिधी – राज्यातील कला केंद्राची संख्या ही ८० च्या वर असून सर्व कला केंद्र हे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन आप आपल्या परीने करत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन आपल्या कलेद्वारे गेल्या १०० वर्षे पेक्षा जास्त कालावधीपासून करत आहेत. गेल्या आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही या लोककलेची सेवा करत आहोत.
राज्यातील महिला कलावंत, पुरुष कलाकार, कामगार व इतर सर्व या व्यवसायावर अवलंबून असणारे जवळपास ३० हजार एवढी मोठी संख्या असून राज्यामध्ये सर्वच ठिकाणी पुरुष वादक कलाकार हे उपलब्ध नसल्याने व त्यांची संख्या फक्त ४०० ते ४५० असल्याने ते सर्वच ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. महिला कलावंतांची लोकसंख्या ही सुमारे २५ हजारांच्या घरामध्ये असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, त्याचबरोबर त्यांच्या वर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
जर सांस्कृतिक कला केंद्रामध्ये पुरुष वादक कलाकार उपलब्ध नसतील, तर आम्ही आमची पारंपारिक लोककला कशी दाखवावी व त्याचं कसं संवर्धन करावं, हा गंभीर प्रश्न आहे. अनेक महिलांनी सांगितले की, आम्ही आमची कला ही पारंपारिक वेशभूषेमध्ये पारंपारिक लावणी सादर करून आमची उपजीविका भागवत आहोत. विनाकारण आमची सध्या राज्यांमध्ये डीजेच्या नावाने बदनामी चालू आहे; आमच्याकडे डीजे नसून अगदी छोटासा साऊंड आहे.
त्या संदर्भात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांनी समिती स्थापित केलेली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. विनाकारण खोट्या बातम्या प्रसारित करू नयेत, असे कलावंतांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, पारंपारिक वाद्य वाजवणारे पुरुष कलाकार उपलब्ध नसल्याने ते पारंपारिक संगीतच परंतु छोट्या साऊंडवर वाजवून आमची कला सादर करत आहेत. आणि जर असे केले नाही, तर आमची कला कशी सादर करणार, हा गंभीर प्रश्न आहे.
अनेक महिला कलावंतांनी प्रश्न उपस्थित केला की, जर अशी परिस्थिती निर्माण झाली, तर आम्ही आमच्या मुला-बाळाचे शिक्षण, आई-वडिलांचा आजारपण व कुटुंब कसे भागवायचे, हा आमच्यासमोर गंभीर प्रश्न उभा राहील. तरीही आम्ही कुठलेही चुकीचे काम करत नसून, विनाकारण समाजमाध्यमांमध्ये चाललेली चर्चा चुकीच्या पद्धतीने आहे.महिला कलावंतना पडलेला प्रश्न आमचा पोटापाण्याचा प्रश्न शासन कसा सोडवणार ? आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल.कळकळीची विनंती आहे की, आमची बदनामी थांबवावी.सांस्कृतिक कलाकेंद्र मालक संघटना, महाराष्ट्र राज्य, अखिल महाराष्ट्र थिएटर मालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनीही कलावंतांच्या बाजूने उभे राहून सत्य माहिती प्रसारित करण्याचे आवाहन केले आहे.
या निवेदनावर मंदा हिरामण चंदन, अलका हौसराव जाधव, संजीवनी रामभाऊ जाधव, राजश्री धोंडाबाई जाधव, किरण पोपट जाधव, भामाबाई किसन जाधव, ज्योती मोतमबाई पवार, अंबिका अंधारे, लता शालन जाधव आदींच्या सह्या आहेत.



