बीड

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत
“एक वही – एक पेन” अभियानातून डॉ. बाबासाहेबांना अनोखी आदरांजली :– डॉ. गणेश ढवळे**
लिंबागणेश :– (दि. ०६)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबागणेश येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दिवे व मेणबत्त्या प्रज्वलित करत उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
मान्यवरांची उपस्थिती आणि भाषणे
या प्रसंगी सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, प्रा. लेनाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिपक घाटे यांनी केले.
कार्यक्रमाला सहशिक्षिका श्रीमती गिते, श्रीमती सानप, श्रीमती अयाचित, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी सरपंच शंकर वाणी, सय्यद अख्तर, सर्पमित्र अशोक जाधव, संदीप मुळे, नितीन जाधव, आरुण निर्मळ, पप्पू निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गणेश ढवळे यांचे प्रेरणादायी मनोगत
डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलेले सर्वोच्च स्थान अधोरेखित करत डॉ. गणेश ढवळे यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या वैचारिक संदेशातून मिळणाऱ्या प्रेरणेवर भाष्य केले.
ते म्हणाले—
“शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि ज्ञानाची न थांबणारी ओढ ही बाबासाहेबांच्या जीवनाची दिशा आहे. सामाजिक न्याय, मानवता, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाहीच्या चार स्तंभांवर त्यांनी आधुनिक भारताची भक्कम उभारणी केली.”
संविधानातील मूल्ये फक्त कायद्यात न राहता प्रत्येकाच्या मनात आणि कृतीत उतरली पाहिजेत, हाच बाबासाहेबांना खरा मानाचा मुजरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“एक वही – एक पेन” : विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना वही–पेन आणि शालेय साहित्याचे वाटप करून डॉ. बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण झाला असून, गावकऱ्यांनीही या कल्पनेचे स्वागत केले.
Back to top button