बीड
शिक्षण असे घ्यावे की जगाने दखल घ्यावी – कोमल मस्के

शिक्षण असे घ्यावे की जगाने दखल घ्यावी – कोमल मस्के
*जाहेर विद्यालयात जिजाऊ–ते–सावित्री दशरात्रोत्सवाची उत्साहात सांगता*
बीड (प्रतिनिधी) : शिक्षण हेच प्रगती, विकास व परिवर्तनाचे एकमेव साधन असून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे सर्व मार्ग शिक्षणातुनच जातात. त्यामुळे शिक्षण असे घ्या की जगाने त्याची दखल घ्यावी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्यात्या, शिवचरित्रकार कोमल मस्के यांनी केले.
श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालय नामलगाव फाटा येथे आयोजित जिजाऊ ते सावित्री दशरात्रोत्सव सोहळ्याच्या सांगता समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. समाज आणि राष्ट्राच्या जडणघडणीत, उभारणीत तसेच इतिहास घडवण्यात महिलांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व जिजाऊ वंदना झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षिका श्रीमती मनिषा जाधव होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सहशिक्षिका श्रीमती रूपाली गायकवाड उपस्थित होत्या. विचारमंचावर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रविंद्र खोड व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राजपुरे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक संतोष डोंगरे यांनी केले.
या दशरात्रोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस विद्यार्थ्यांना संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई जिजाऊ, येसुराणी, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, रखमाबाई राऊत, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आदी इतिहास घडवणाऱ्या कर्तबगार स्त्री व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जातो. त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा जागर करण्यात येतो.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात करताना वक्त्यांनी जिजाऊ, सावित्री व अहिल्या यांनी दिलेले विचार आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. जिजाऊंनी शिवराय आणि शंभूराजे घडवले, अहिल्याबाई होळकर यांनी समर्थपणे होळकर घराण्याचा वारसा पुढे चालवला, सावित्रीबाईंनी दगड-शेणाचा मारा सहन करून शिक्षणाची ज्योत पेटवली, तर रमाईने बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कम पाठबळ उभे केले. शिक्षण घेतल्यानंतर महिलांनी अंधश्रद्धा व कर्मकांडात अडकू नये, तर शिक्षणातून परिवर्तन घडवावे, असे आवाहन करण्यात आले. आज प्रत्येक घरात जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई घडणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या दशरात्रोत्सवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सहशिक्षिका मनिषा जाधव, तर इंदिरा गांधी, कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्याविषयी कृष्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रूपाली गायकवाड, कल्याण जाधव व रविंद्र खोड, संतोष डोंगरे यांनीही विविध स्त्री व्यक्तिमत्त्वांचे कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले. पत्रकार व शिवव्याख्याते अभिषेक सोळुंके यांनी जिजाऊ व सावित्री यांचे विचार प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले व जिजाऊ सावित्री या नावामागे लपलेला मतितार्थ सांगितला. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रविणकुमार तरकसे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमात प्रियंका करपे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने उपस्थितांची मने जिंकली. तसेच युवक दिनाचे औचित्य साधून जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या कार्य, विचार व कर्तृत्वाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हा वैचारिक सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. दहा दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांचे नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, विचार याबद्दल माहिती पोहोचवली जाते. विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं व त्यांच्यामध्ये प्रतिभा फुलावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम महत्त्वाचा आहे अशा भावना मान्यवरांकडून करण्यात आल्या.



