
तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्या;
विद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीची एसपींकडे मागणी
बीड (प्रतिनिधी) उमाकिरण शैक्षणिक संकुलमधील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी प्रा.विजय पवार, प्रशांत खाटोकर यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथक करत आहे. मात्र हा तपास संशयास्पद असून सर्व प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी विद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीने सोमवारी (दि.30) पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
क्लासेसमधील विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विजय पवार, प्रशांत खाटोकर यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे. मात्र पिंक पथकाची भूमिका संशयास्पद आहे. पवार, खाटोकर यांना अटक केल्यानंतर पिंक पथकाने पीसीआरची मागणी केली मात्र सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली नाही जी गरजेची आहे. सीडीआर, एसडीआर तपासणीचा व पीडितेचे फोटो ज्या मोबाईलमध्ये आहेत त्या मोबाईलचा पीसीआर यादीत उल्लेख केलेला नाही. यावरुन पिंक पथकाच्या भूमिकवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. यामुळे पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळण्यासाठी सर्व प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, कोचिंग क्लासेस मधील सी.सी.टी.व्ही फुटेज आणि आसपासच्या कोचिंग क्लासेस मध्ये तपास करावा, प्रत्येक कोचिंग क्लासेस मधील स्टाफ मध्ये दोन महिला कर्मचारी अत्यावश्यक कराव्यात, आरोपीला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे सी.डी. आर. आणि एस. डी. आर तपासून त्यांनासह आरोपी करण्यात यावं, सदर आरोपींना कोर्टात नेतांना हातकडया का घातया नाही याची पण माहिती द्यावी, उमा किरण संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींचे सक्षम महिला अधिकाऱ्यांसोबत गुप्त जॉब नोंदवण्यात यावेत, विजय पवार यांच्या क्लासेस शाळा येथील व्यवहाराचे सर्व रेकॉर्ड ताब्यात घेऊन त्याची ई.डी. मार्फत चौकशी करण्यात यावी, राज्य महिला आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन म्हणजे कोचिंग ला सील करण्यात यावा, क्लासेस मधील विद्यार्थ्यांची फीस वापस देण्यात यावी, पवार यांच्या शिकवणी ची नोंदणी केलेली आहे का याचा तपास करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीच्या अॅड. संगिता धसे, शांताबाई पाळवदे, मुसळे ताई, मंगल जायभाये, किरण डोळस, हिराबाई कांबळे, प्रा.सचिन उबाळे, अॅड.महेश धांडे, अनुरथ वीर, सोमेश कदम यांनी केली आहे.



