बीड

श्रीवर्धनमध्ये चोरांचे राज्य की पोलिसांचे? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले निवेदन!

श्रीवर्धनमध्ये चोरांचे राज्य की पोलिसांचे? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले निवेदन!
श्रीवर्धन (संदेश घोलप ): ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. “नागरिक सुरक्षित आहेत का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. पक्षाचे उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जळजळीत निवेदन सादर केले.पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
शहरात एकामागून एक होणाऱ्या चोरीच्या सत्रांमुळे सामान्य जनतेत दहशतीचे वातावरण आहे. “पोलीस नक्की करतात काय?” असा सवाल विचारण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी गस्त केवळ नावापुरतीच उरली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, श्रीवर्धनकर सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. घरातील मौल्यवान वस्तू सोडाच, पण जीवही सुरक्षित नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करून गुन्हेगारांना जेलची हवा दाखवावी, अन्यथा यापुढील उद्रेकास प्रशासन जबाबदार असेल.
या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पोलीस प्रशासन यावर नेमकी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण श्रीवर्धनचे लक्ष लागले आहे.
निवेदनातील प्रमुख आणि आक्रमक मागण्या:
 रात्रीची गस्त केवळ कागदावर नको:शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य चौकांमध्ये रात्रीची कडक पोलीस गस्त वाढवा.
 संशयितांची झाडाझडती घ्या: शहरात विनाकारण फिरणाऱ्या संशयित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करा.
 सीसीटीव्ही आणि सुरक्षा यंत्रणा: शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा.
 कठोर कारवाईचा इशारा:जर चोरीच्या घटनांना लगाम बसला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.

Back to top button