बीड

संत हे साहित्यिक असतात आणि साहित्यिक हे देवरूपी असतात:- डॉ.बाबुराव उपाध्ये

संत हे साहित्यिक असतात आणि साहित्यिक हे देवरूपी असतात:- डॉ.बाबुराव उपाध्ये

अहिल्यानगर/प्रशांत बाफना- मानवी संस्कृती ही सहजीवन आणि समर्पित सेवेतून आकाराला आली असून त्यामध्ये प्राचीन ऋषी-मुनी, संत, समाजसेवक आणि साहित्यिक यांचे जीवनध्येय जगाच्या कल्याणार्थ असून , संत हे साहित्यिक असतात आणि साहित्यिक हे देव स्वरूपाचे असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील त्र्यंबकेश्वर मंदिर भव्य सभागृहात प. पू. काटेस्वामीजी व्यासपीठ, या ठिकाणी लोककला, कलावंत ,साहित्यिक परिषद व बहुजन समाज संघटना महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज एक दिवशीय साहित्य संमेलनच्या समारोप अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
यावेळी विचार मंचावर
उद्घाटक म्हणून उक्कलगाव येथील ह.भ.प. बाबा महाराज ससाणे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून राहाता येथील साहित्यिक राजेंद्र फंड, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी.ई. शेळके, ह.भ.प. भागवतराव मुठे महाराज पाटील, सरपंच चंद्रकला पवार, साहित्यिक सायमन भारस्कर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन, सचिन पवार, पाथर्डीचे कवी बाळासाहेब कोठुळे, ह.भ.प. भागवत मरकड महाराज, ह.भ प. अमोल सोळसे महाराज, शाहीर भारत गाडेकर, प्रा. शिवाजीराव बारगळ , कवी पोपटराव पटारे, ॲड्. प्रा. आदिनाय जोशी, कवयित्री संगीता फासाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भजन गायन, श्रीज्ञानेश्वर माऊली प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. सरपंच चंद्रकला पवार यांच्या हस्ते सुभाष चारुडेसर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. संयोजक कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी स्वागत,व प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय करून दिला. बाबासाहेब पवार, बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोंडगे, प्रा.राजेंद्र थोरात आदिना पाहुण्यांचा शाल, पुस्तके, गुलाबपुष्पे, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या समारोपात पुढे म्हणाले, साहित्यिक हे समाजातील आदर्श असतात, संतांप्रमाणे ते समाजप्रबोधन करतात. त्यांनी एकमेकांचा आदर करावा, सुसंवाद साधावा, निर्मळ मनातून मैत्री करावी. चर्चा आणि सुसंवाद करतो तोच आदर्श साहित्यिक होय. साहित्यक्षेत्र एक लेखन, वाचन आणि सेवेचे तीर्थस्थळ आहे, अशा पवित्र भावनेने बोलावे आणि लिहावे असे आवाहन करून त्यांनी संतसंगतीत मिळे समाधान ही कविता सादर केली.
गेल्या अनेक वर्षापासून लोककला कलावंत यांच्यासाठी विविध उपक्रम आणि पुरस्कारातून वाचन, लेखन आणि समाजप्रबोधन सुरू आहे, ग्रामस्थ आणि बहुजन समाज संघटना यांचे खूप सहकार्य आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श जपत असतानाच संतांनी जी ‘ज्ञानदीप लावू जगी’ भूमिका घेतलेली होती तीच मी सर्वांच्या सहकार्याने पुढे नेत आहे. साहित्य आणि साहित्यिक हेच माझे आदर्श असून तीच माझी जीवनसाधना असल्याचे मत प्रास्ताविक करताना संयोजक बाबासाहेब पवार यांनी सांगून सर्वांचे ऋण व्यक्त केले.स्वागताध्यक्ष राजेंद्र फंड म्हणाले, माझ्या वाढदिवसाची आणि सेवानिवृत्ती च्या पहिल्या दिवसाची फार मोठी भेट स्वागताध्यक्ष रुपाने मला मिळाल्याचे समाधान व्यक्त करीत, बाबासाहेब पवार यांच्या साहित्यसेवेचे कौतुक केले. उद्घाटक ह.भ.प. बाबा महाराज ससाणे म्हणाले, संतांनी माणुसकीला धर्म सांगितला, हा आदर्श साहित्यिकांनी जपला पाहिजे, तसे विचार, आचार आणि लेखन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सुभाष त्रिभुवन, सायमन भारस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाबासाहेब पवार, त्यांच्या मातोश्री आणि परिवारांचा सन्मान करण्यात आला, यासंदर्भाने प्रा. राजेंद्र थोरात यांनी निवेदन केले. परिसंवादमध्ये ह.भ.प. भागवतराव मुठे महाराज पाटील यांनी संतांचे योगदान सांगितले. डॉ. शिवाजी काळे यांचे ज्ञानेश्वर आणि संत अभंगातील चमत्कार या विषयाचा लेख कवयित्री संगीता फासाटे यांनी वाचून दाखविला. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेला संतसाहित्य हे अध्यक्षीय मनोगत वाचून दाखविले. बाळासाहेब कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अनेक कवी- कवयित्री यांनी बहारदार कविता सादर केल्या. बाळासाहेब कोठुळे यांनी सर्व कवींचे मनोगतातून कौतुक केले. व आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिकाने लिखाण करताना वास्तववादी लिहावे व काळजाला भीडणारे लिखाण करावे असे आव्हान उपस्थित साहित्यिकांना केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांना ग्रंथभेट देऊन वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन केले.उद्घाटन सत्राचे बहारदार सूत्रसंचालन ॲड. प्रा. आदिनाथ जोशी यांनी केले तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री संगीता फासाटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कवी आत्माराम शेवाळे, राजेंद्र उदारे, प्रदीप बोडखे, संभाजी बडे, पत्रकार अनिल खाटेर, रूपचंद शिदोरे, सुरेश वैरागर, डॉक्टर बेनझीर शेख, मोहनी राज होन, बाळासाहेब मंतोडे, निवृत्ती महाराज कानवडे , यांच्यासह अनेक मराठी साहित्सीक हजर होते. बाबासाहेब पवार यांनी सर्वांचेआभार मानले.

Back to top button