बीड
पिंपळनेरसह परिसरात गारपीट; पिकांचे प्रचंड नुकसान

पिंपळनेरसह परिसरात गारपीट; पिकांचे प्रचंड नुकसान
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी पावणेसहा वाजता अर्धा तास अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.आंब्याचा तर सडाच पडला होता.
पिंपळनेरसह परिसरातील ताडसोन्ना, घाटसावळी ,मन्यारवाडी,सांडरवन, पिंपळादेवी,लिंबारुई सह वाडी, वस्ती, गावात जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. सध्या काढणी चालू असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच, डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी ,अंबा आदी फळबागांनाही या गारपिटीचा फटका बसला आहे.
द्राक्षबागांनाही फटका बसून द्राक्षांना तडे जाऊन फळ गळती झाली.तसेच गारपिटीमुळे आंब्याची झाली मोठी फळगळ झाली आहे, असे फळ उत्पादक शेतकरी श्रीकांत ठोकरे यांनी सांगितले. तसेच शेतातील चारा पिकांची वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळून हानी झाली आहे. शिवाय, आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावरती फळगळ झाल्याचे शेतकरी कुंडलिक जाधव यांनी सांगितले.



