बीड

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी देणगी – प्राचार्य विकी घायतडक

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी देणगी – प्राचार्य विकी घायतडक

भारतीय इतिहासात काही क्षण असे असतात, जे संपूर्ण पिढ्यांचे भविष्य बदलून टाकतात. त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केवळ संविधान दिले नाही, तर माणसाला “माणूस” म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केला.
शतकानुशतके अन्याय, अस्पृश्यता आणि अपमान सहन करणाऱ्या समाजाला बाबासाहेबांनी स्वाभिमानाची नवी ओळख दिली. “तुम्ही कमी नाही, तुम्हालाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे,” हा त्यांचा संदेश केवळ शब्द नव्हता, तर लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देणारी क्रांती होती.

बाबासाहेबांनी दिलेला अधिकार हा केवळ कागदावरचा नाही, तर प्रत्येकाच्या अस्तित्वाला बळ देणारा आहे. त्यांनी माणसाच्या डोळ्यात स्वप्न दिले, मनात आत्मविश्वास निर्माण केला आणि उभं राहण्याची हिंमत दिली.बाबासाहेबांचे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे तत्वज्ञान आजही तितकेच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, याची जाणीव करून देत त्यांनी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेले.

आजही समाजात विषमता आणि अन्याय पूर्णपणे संपलेले नाहीत. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार हेच मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात. ते आपल्याला फक्त अधिकार देत नाहीत, तर त्या अधिकारासाठी लढण्याची जिद्दही देतात.डाॅ.बाबासाहेबांना खरी आदरांजली द्यायची असेल, तर त्यांच्या विचारांनुसार जगले पाहिजे. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येईल, असा समाज निर्माण करणे हीच त्यांची खरी शिकवण आहे.

शब्दांकन
मा. विकी धर्मेंद्र घायतडक
प्राचार्य – डिप्लोमा काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी पाॅलिटेक्निक, जामखेड
नगरसेवक – जामखेड नगर परिषद, जामखेड

Back to top button